सर्दी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
सर्दी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
हवामानातील बदलांचा परिणाम; लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हैराण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे आणि अचानक जाणवणाऱ्या उन्हामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. परिणामी सर्दी, खोकला आणि व्हायरल तापाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून, शहरातील खासगी, शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्ण मोठ्या संख्येने दिसत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून शहरात दिवस उष्ण आणि रात्री थंड वातावरणामुळे विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर या बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले, की बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होत असून, मुलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरातील दवाखान्यांमध्ये दररोज ६० ते ७० रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारींसह दाखल होत आहेत. झोपडपट्टी आणि चाळीच्या भागांमध्ये विषाणूजन्य तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत. घशात खवखव, अंगदुखी आणि अशक्तपणा यांसारख्या लक्षणांची तक्रार वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, हवामानातील अनियमित बदलांमुळे प्रतिकारशक्ती कमी होत आहे. त्यामुळे विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांनी अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे.
बाह्यरुग्ण विभागात मुलं आणि ज्येष्ठांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. तापमानात बदल दिसून येत आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ. शैलेश मोहिते,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय
आरोग्यतज्ज्ञांकडून नागरिकांना सूचना
* कोमट पाणी नियमितपणे प्या.
* बाहेर पडताना मास्कचा वापर करा.
* सर्दी, खोकल्याच्या रुग्णांनी संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरावा.
* गरम, पौष्टिक आणि घरगुती अन्न आहारात घ्यावे.
* स्वच्छतेचे पालन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

