भांडुप संकुलात २,००० एमएलडी क्षमतेचे नवीन जल-उदंचन केंद्र; १,८६९ कोटींचा प्रकल्प

भांडुप संकुलात २,००० एमएलडी क्षमतेचे नवीन जल-उदंचन केंद्र; १,८६९ कोटींचा प्रकल्प

Published on

पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी
भांडुप संकुलात नवीन जल-उदंचन केंद्र; दोन हजार एमएलडी क्षमता, १,८६९ कोटींचा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः महानगरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी भांडुप संकुलात २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे आधुनिक जल-उदंचन केंद्र उभारण्याच्या प्रकल्पास गती मिळाली आहे. जुन्या जलप्रक्रिया केंद्राची ४५ वर्षांची झीज, वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार पाण्याची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रकल्प सुरू केला आहे.

भांडुप जलप्रक्रिया केंद्र हे १९७८ मध्ये सुरू झाले असून शहराला मिळणाऱ्या प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी जवळपास ५० टक्के पाणी पुरवते. रसायनांच्या संपर्कामुळे झालेली संरचनांची झीज पाहता नवीन, उच्च क्षमतेचे व तांत्रिकदृष्ट्या सक्षम उदंचन केंद्र उभारणे गरजेचे आहे. नवीन केंद्रातून प्रक्रिया झालेले पाणी जलाशयात पाठवून पश्चिम उपनगरात पुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून योग्य अहवाल, प्रकल्प आराखडे, सर्व्हे आणि निविदा कागदपत्रे यांसह सर्व आवश्यक प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आहे.

प्रकल्पात स्वयंचलित व्यवस्थापन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे यंत्रणांचे भविष्यातील परिरक्षण शक्य होईल. कंत्राट कालावधी ४२ महिने बांधकाम आणि १५ वर्षे प्रचालन-परिरक्षण असा आहे. सुमारे एक हेक्टर जागेवर हे केंद्र उभारले जाणार आहे. प्रकल्पात संरचना, आवश्यक परवानग्या, जलप्रक्रिया केंद्राशी जोडणी, उदंचन केंद्राचे बांधकाम, पोलादी जलवाहिन्या, रस्ते, यांत्रिकी व विद्युत कामे, स्काडा, अग्निसुरक्षा आणि सीसीटीव्ही यांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षे संचालन व देखभालही कंत्राटदाराकडूनच केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया ओपन टेक्नॉलॉजी - डिझाइन, बिल्ड ॲण्ड ऑपरेट (डीबीओ) पद्धतीनुसार पार पडली. शंकरनारायणा कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, अमृता कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जी.व्ही.पी.आर. इंजिनिअर्स लिमिटेड यांनी बोली सादर केली होती. तांत्रिक पात्रता तिन्ही कंपन्यांनी पूर्ण केली.

आर्थिक निविदांमध्ये शंकरनारायणा कन्स्ट्रक्शन्स १,७२१.०९ कोटींच्या प्रत्यक्ष खर्चासह लघुत्तम ठरले. प्रकल्पाचा कार्यालयीन अंदाज १,८६९.७९ कोटी रुपये असून लघुत्तम निविदा हा अंदाजापेक्षा ७.९५ टक्के कमी आहे. प्रकल्पातील एकूण खर्चात ९३७.९० कोटी रुपये संकल्पना व बांधणीसाठी, ८९.१५ कोटी प्रचालन-परिरक्षणासाठी, ७८१.१८ कोटी वीज खर्चासाठी आणि ६१.५६ कोटी यंत्रसामग्री बदलासाठी अपेक्षित आहेत.

प्रकल्पाची गरज आणि वैशिष्ट्ये
१९७८ मध्ये सुरू झालेले जुने भांडुप जलप्रक्रिया केंद्र शहराला लागणाऱ्या पाण्यापैकी ५० टक्के पाणी पुरवते; परंतु रसायनांच्या संपर्कामुळे त्याची संरचना जीर्ण झाली आहे. नवीन केंद्राची क्षमता २,००० एमएलडी (सामान्य प्रवाह) आणि २,२०० एमएलडी (मध्यम प्रवाह) अशी डिझाइन करण्यात आली आहे. या प्रकल्पात स्वयंचलित व्यवस्थापन यंत्रणा आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित यांत्रिकी व विद्युत प्रणालीचा समावेश असेल. १२० मीटर उंचीच्या इमारतीसाठी विमानतळ प्राधिकरणासह पर्यावरण आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत.

वेळेची मर्यादा
कंत्राट ‘डिझाइन, बिल्ड अँड ऑपरेट’ या तत्त्वावर आधारित असून, महापालिकेने प्रकल्पाचे बांधकाम ४२ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर पुढील १५ वर्षांसाठी संचालन व देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची असेल. या नवीन केंद्राद्वारे प्रक्रिया केलेले पाणी जलाशयात पाठवून प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होईल, असा महापालिकेचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com