मुरूड तालुक्यातील क्रीडांगणाची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूड तालुक्यातील क्रीडांगणाची प्रतीक्षा
मुरूड तालुक्यातील क्रीडांगणाची प्रतीक्षा

मुरूड तालुक्यातील क्रीडांगणाची प्रतीक्षा

sakal_logo
By

मुरूड, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यातील विहूर येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येणार होते; मात्र याबाबत अद्यापही कार्यवाही झाली नाही. मुरूड पालिकेनेही शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ भूखंड निश्‍चित केला आहे; परंतु याबाबतही कार्यवाही होत नसल्याने क्रीडापटूंसमोर सरावासाठी जागेचा प्रश्‍न आहे. क्रीडांगणाअभावी समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर अनेक जण व्यायाम किंवा खेळाची हौस भागवतात.
ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडागुणांचा विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने क्रीडा धोरण तयार केले आहे. प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा आणि विभाग संकुलेही बांधण्यात येत आहे. मात्र, ही योजना मुरूड तालुक्यात कार्यान्वित झाली नाही. या संकुलासाठी २००४ मध्ये विहूर येथे एक भूखंड निश्‍चित केला होता. त्यानंतर भूमिपूजनही केले होते; परंतु याबाबत पुढे काहीही कार्यवाही झाली नाही. तसेच पालिकेच्या माध्यमातून वसंतराव नाईक कॉलेजच्या जवळ सुमारे पाच एकर खासगी जागा आरक्षित आहे. त्या जागेवर प्रस्ताव मंजूर झाल्यास पालिका चटई क्षेत्राच्या ४० टक्के वाढीव बांधकामाला भूखंडधारकांना परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव पालिकेने तातडीने अंमलात आणावा, अशी मागणी आहे; परंतु अलिकडे नगरसेवकांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्‍न सुटलेला नाही.

मुरूड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसाद चौलकर यांनी यासाठी तहसीलदारांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत तालुका क्रीडाप्रमुख पांडुरंग आरेकर यांनी सांगितले की, शहरात पूर्वीपासूनच क्रीडा क्षेत्रात नाव लौकिक असलेले खेळाडू होते; पण क्रीडांगण नसल्याने क्रीडा नैपुण्य असूनही सरावाअभावी ते अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत.

मुरूड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांनी सांगितले की, क्रीडांगण हे मुरूड शहरातच असावे. मुरूड पालिकेच्या वसंतराव महाविद्यालयाजवळ यासाठी आरक्षित जागा आहे. संबंधित जमीनमालकाला बाजारमूल्याप्रमाणे किंमत देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी पालिकेचे शहर नियोजन कार्यालय आणि संबंधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन निर्णय करणे गरजेचे आहे.
......................
मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या शेजारी खासगी जागा आहे. ती क्रीडांगणासाठी राखीव आहे. पालिकेने सहकार्य केल्यास सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. क्रीडांगणासाठी अन्य जागा जरी उपलब्ध करून दिली, तरी प्रस्ताव करून क्रीडा संकुल उभारण्याची तयारी आहे.
- रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी
....
मुरूड तालुका क्रीडांगण किंवा मुरूड पालिका हद्दीतील क्रीडांगणासंदर्भात तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी अद्याप कोणताही प्रस्तावाबाबत किंवा क्रीडांगणाची मागणी केलेली नाही.
- अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01364 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top