
मुरुड समुद्र किनारी तेल तवंग
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : मुरूड समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग पसरल्याने संपूर्ण अडीच किमीचा समुद्रकिनारा विद्रूप दिसत आहे. लहान आकाराचे डांबरगोळे आणि तेलजन्य पदार्थांचे अवशेष किनाऱ्यावर पसरल्याने मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान होत असून येणारे पर्यटक तथा स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आगरदांडा-दिघी जेटीजवळ येणाऱ्या मोठ्या जहाजांमधून होणाऱ्या तेलगळतीचा परिणाम व त्याचबरोबर बंदरात तेल लावून ठेवलेल्या बोटी आदी कारणांमुळे समुद्राच्या पाण्यात तेल मिसळते. हा तेलाचा तवंग लाटांबरोबर किनाऱ्यावर येतो. काही वेळा हा तवंग वाळूच्या संपर्कात आल्याने त्यांच्या डांबरसदृश गोळ्या तयार होतात. अशा या गोळ्यांमुळेच मुरूड समुद्र किनारा विद्रूप झाला आहे. तेलतवंगाच्या दुष्परिणामामुळे माशांच्या जननक्षमतेवर परिणाम संभवतो. यामुळे छोट्या मच्छीमारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या तवंगामुळे मासेमारीसोबत पर्यटनावरही परिणाम झाला आहे.
शासकीय यंत्रणा निद्रीस्त
केवळ पंधरवड्याच्या अंतराने मोठ्या प्रमाणात तेल वाहून आल्याने किनारा मोठ्या प्रमाणात विद्रूप झाला आहे. महिन्यातून दोनदा समुद्र किनारी तेल तवंग आले तरी शासकीय यंत्रणा निद्रीस्त दिसते. सदर तेल वारंवार का येत आहे याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व मत्स्य विभाग हा कोणतीही चौकशी करीत नसल्याने नागरिक मात्र बेचैन झाले आहेत. गेल्या सप्टेंबर २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणावर तेल तवंग वाहून आल्याचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निर्दशनास आणून दिले असता त्यांनी किनारपट्टीवरील ग्रामपंचायत व नगर परिषदेला किनारा स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. मच्छीमार बांधव जेली फिशच्या समस्येतून सावरत असतानाच पुन्हा या तेल तवंगामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत. मेरीटाईम बोर्ड वा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी लक्ष घालून हे सागरी प्रदूषण थांबवावे, अशी मागणी होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Md122b01391 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..