एकदरा पूल वाहतुकीसाठी कमकुवत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकदरा पूल वाहतुकीसाठी कमकुवत
एकदरा पूल वाहतुकीसाठी कमकुवत

एकदरा पूल वाहतुकीसाठी कमकुवत

sakal_logo
By

मुरूड, ता. २२ (बातमीदार) ः ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यासाठी राजपुरी, खोराबंदर, डोंगरी सुभा, माझेरी आणि एकदरा या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून एकदरा खाडी पूल ओळखला जातो. साठी उलटलेला हा पूल सद्यस्‍थितीत कमकुवत झाला आहे. पर्यटकांसह स्‍थानिक वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अपघातासारखी दुर्घटना टाळण्यासाठी पुलाचे स्‍ट्रक्‍चरल ऑडिक करण्याची मागणी स्‍थानिकांकडून करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने १९६३ मध्ये एकदरा-मुरूड खाडीवरील पूल बांधला. या बांधकामास जवळपास ६० वर्षे झाली असून पूल जीर्णावस्‍थेत आहे; शिवाय पुलाचे कठडेही खिळखिळे झाले आहेत. एखादे अवजड वाहन केल्‍यास पुलाला हादरे बसतात. त्‍यामुळे सावित्री नदीवरील घटनेप्रमाणे दुर्घटना टाळण्यासाठी पुलाचे डागडुजी करावी; अथवा नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी एकदरा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूला होड्या नांगरण्यासाठी मच्छीमारांची नेहमीच गर्दी असते. एकदरा वगळता अन्य किनाऱ्यावर प्रशस्त जागा नसल्याने बहुतांश कोळी बांधव होडीवर बर्फ व रेशन-पाणी, डिझेल आदी रसद ठेवण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधून होड्या नांगरतात. त्यामुळे कठड्यांचे प्लास्‍टर निखळले आहे.

पुलावर मोकाट गुरांचा वावर
एकदरा पुलावर अनेकदा मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली दिसतात. त्‍यामुळे वाहतूक कोंडीची समस्‍या उद्‌भवते. गुरांचा वावर, त्यांच्या मलमूत्राची दुर्गंधीतूनच पर्यटकांसह स्थानिकांना वाट काढून मार्गक्रमण करावे लागते. एकदरा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो; मात्र त्‍याची स्वच्छता कुणी करायची, हा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे.

वर्षभर पर्यटकांची वर्दळ
मुरूड-जंजिरा या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. लाखो देश-विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देत असून परिसर अस्‍वच्छ असल्‍यास पर्यटनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. पुलाची डागडुजी करून परिसर स्‍वच्छ करण्याची मागणी एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

एकदरा पुलासाठी ५ कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. केवळ तांत्रिक बाबी तपासून संबंधित प्रस्‍ताव मुंबईतील मुख्य अभियंता कार्यालयाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- अक्षय माने, सहायक अभियंता, सार्वजनिक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01581 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..