नांदगावमध्ये आरोग्य केंद्र डॉक्टरविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगावमध्ये आरोग्य केंद्र डॉक्टरविना
नांदगावमध्ये आरोग्य केंद्र डॉक्टरविना

नांदगावमध्ये आरोग्य केंद्र डॉक्टरविना

sakal_logo
By

मुरूड, ता. ८ ः (बातमीदार) ः तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. थंडीच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या आजार किंवा सर्पदंश, विंचुदंश असे प्रकार होत असतात; पण वैद्यकीय अधिकारीच नसल्याने लोकांनी कुठे जावे, असा प्रश्न पडला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. लवकरात लवकर याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

दिवसा कडाक्याचे ऊन; तर रात्री थंडी यामुळे सर्दी, ताप यांसारखे आजार बळावत आहेत. लोकांसाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हेच उपचारासाठी एकमेव ठिकाण आहे. नांदगाव ग्रामपंचायतीसह लगतच्या उसरोली, मजगाव, वेळास्ते या गावांचे मिळून जवळपास २०ते २५ हजार नागरिक याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. तेव्हा इथे आवश्यक त्या आरोग्य सविधा आणि वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे; पण गेल्या काही दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारीच नाही. हंगामी वैद्यकीय अधिकाऱ्याचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यविना आरोग्य केंद्र लोकांसाठी कुठल्याही उपयोगाचे ठरत नाही. याबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती विदारक झाली असून इथे वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. गटविकास अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली आहे. याचा गांभीर्याने विचार न झाल्यास आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल.