राजापुरी जेटीवरील वाहनतळाला टाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरी जेटीवरील वाहनतळाला टाळे
राजापुरी जेटीवरील वाहनतळाला टाळे

राजापुरी जेटीवरील वाहनतळाला टाळे

sakal_logo
By

मुरूड, ता. १५ (बातमीदार) ः जंजिऱ्यावर किल्‍ल्‍यावर पर्यटकांच्या सोयीसाठी मेरिटाईम बोर्डातर्फे कोट्यवधी रुपये खर्चून राजपुरी बंदरावर जेटी उभारण्यात आली आहे. याठिकाणी उपहारगृह, स्वच्छतागृह, स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून छोटे छोटे स्टॉल्स व शेकडो वाहने उभी करता यावीत यासाठी पार्किंग व्यवस्‍थाही करण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराने तब्‍बल ३८ लाखांची बिल थकवल्‍याने मेरिटाईम बोर्डाने मंगळवारी वाहनतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले आहे.
दिवाळीपासून जंजिरा किल्‍ल्‍यासह मुरूड, काशीद बीचवर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र वाहनतळ बंद केल्‍याने पर्यटकांची गैरसोय होत असून वाहने रस्‍त्‍यालगत उभी करावी लागत आहेत. समुद्रकिनारी वाहने उभी केल्‍यास ती वाळूत रुतल्‍याच्या घटना यापूर्वी घडल्‍या आहेत. शिवाय उधाणामुळे वाहने पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
राजपुरी जेटीवरील कार्यालय व पार्किंगचा ठेका मुंबईतील व्यावसायिकाने ५ वर्षांपूर्वी १७ लाख वार्षिक भाडे तत्त्वावर घेतला होता. मात्र त्‍यानंतर त्‍याने राजपुरीतील रहिवासी, बेरोजगार युवकांना वाहनतळ दिल्‍याचे बोलले जात आहे.

ठेकेदाराने ३८ लाख रुपये थकवले आहे. वारंवार मागणी करूनही ते अदा न केल्याने मुख्य कार्यालयाच्या आदेशाने मंगळवारी वाहनतळाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.
- यशोधन कुलकर्णी, बंदर अधिकारी, मेरिटाईम बोर्ड

वाहने असुरक्षित
भरतीच्या वेळी पार्किंगसाठी जागा नसल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. पार्किंगचे पैसे भरून गाडीची सुरक्षा नसल्याने जेटीवरील पार्किंग लवकर सुरू करावी अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे. याप्रकरणी मेरिटाईम बोर्डाकडून नवीन ठेकेदार नियुक्‍तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.