मच्छीमारांची रात्री-बेरात्री दमछाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मच्छीमारांची रात्री-बेरात्री दमछाक
मच्छीमारांची रात्री-बेरात्री दमछाक

मच्छीमारांची रात्री-बेरात्री दमछाक

sakal_logo
By

मुरूड, ता. ४ (बातमीदार) : एकदरा खाडी आणि मुरूड समुद्रकिनाऱ्यालगत बोटी लावण्यासाठी रात्री-बेरात्री कोळी बांधवांना खूपच दमछाक करावी लागते. समुद्रातून मासेमारी करून आलेल्या बोटी सुरक्षितपणे किनाऱ्यावर याव्यात, यासाठी ग्रोयन्स बंधारा लवकरात लवकर बांधून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मच्छीमारांकडून होत आहे.
समुद्राला ओहोटी लागल्यावर मच्छीमार बोटी किनाऱ्याला लागणे कठीण होते. त्यामुळे पकडलेली मासळी किनाऱ्यावर आणण्यासाठी भरतीची वाट पाहावी लागते. या प्रक्रियेत तासन् तास वाया जातात. परिणामी, कष्टाने मिळालेली मासळी प्रसंगी शिळी होऊन मच्छीमारांचे मोठे नुकसान होत असते. अनेकदा मच्छीमार रात्री-बेरात्री येतात. अशा वेळी ओहोटी असल्यास मच्छीमारांना बोटी सुरक्षितपणे किनाऱ्यावर लावता येत नाही. यात त्यांची प्रचंड दमछाक होते. या बाबी टाळण्यासाठी सरकारने ग्रोयन्स बंधारा बांधण्याची अत्यंत गरजेचे आहे. संबंधित खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी ग्रोयन्स बंधाऱ्याची निर्मिती करून मच्छीमारांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रोयन्स बंधारा नसल्याने मच्छीमारांची दमछाक आणि मासळीचे नुकसान होत आहे. यासाठी ग्रोयन्स बंधाऱ्यासंदर्भात पत्तन व मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही


पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त
मुरूड हे पर्यटन स्थळ असून समुद्रकिनारी विशेषतः वीकेण्डला शेकडो पर्यटकांचा राबता असतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा बंधारा उपयोगी ठरणार आहे. पर्यटकांनाही पोहण्याचा अंदाज या बंधाऱ्याच्या निमित्ताने येऊ शकेल आणि दुर्घटनाही टळतील. यापूर्वी महेंद्र कंपनीचे सहा कामगार आणि २०१६ मध्ये भोवरा असलेल्या पट्ट्यात पुणे येथील इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना पोहण्याच्या नादात प्राण गमवावे लागले आहेत. या ठिकाणी ग्रोयन्स बंधारा असता तर ही घटना टळू शकली असती.

आश्वासनांचे गाजर
ग्रोयन्स बंधारा नसल्याने सर्वांचे नुकसान होत आहे. या बंदरासाठी आम्ही नऊ वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. यासाठी माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांना नवापाडा कोळी समाजाने निवेदन दिले होते. त्या वेळी जानकर यांनी ग्रोयन्स बंधारा होण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि संबंधित खात्यांचे अधिकारी यांची एकत्रित सभा घेतली. तसेच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रोयन्स बंधाऱ्यास त्वरित मंजुरी देण्याचे आश्वासन दिले; परंतु अद्याप कोणतीच पूर्तता झाली नाही, असे रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले म्हणाले.