
मुरूडमध्ये क्रीडा धोरण कागदावरच
मेघराज जाधव : सकाळ वृत्तसेवा
मुरूड, ता. २८ : ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे, त्यांच्यातील उपजत खेळाची गुणवत्ता वाढीस लागावी आणि कसदार खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने २००१ पासून क्रीडा धोरण आखले आहे. विशेषत्वाने तालुका क्रीडांगण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही मुरूड तालुक्यातील विहूर हे क्रीडा संकुल क्रीडा विभागाने नाकारले आहे. त्यामुळे दहा वर्षांपासून मुरूड तालुका क्रीडा संकुलापासून वंचित आहे.
मुरूड नजीकच्या विहूर ग्रामपंचायत हद्दीतील एक हेक्टर जागेत तत्कालीन राज्यमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते १० मे २०१३ मध्ये भूमिपूजन झाले होते. एक कोटी रुपयाची तरतूदही अर्थसंकल्पात झाली होती. क्रीडा संकुलाकडे जाण्यासाठी रस्ता; तसेच डोंगराळ जमिनीच्या सपाटीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता भासेल, असे तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ही जागाच डोंगरउताराची असल्याने क्रीडा संकुलाचे उद्घाटन हा विषयच चर्चेचा ठरला आहे. पुरोगामी राज्यात ११ जिल्ह्यांत क्रीडा प्रबोधिनी स्थापन झाल्या असून, रायगड जिल्ह्यातही कार्यान्वित व्हावी. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मुरूडसारख्या ग्रामीण डोंगरी भागात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
अलीकडे प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा संकुल उभारण्याची जोरदार तयारी सुरू आहे. क्रीडा क्षेत्रावर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. तालुकास्थानी क्रीडा संकुलच अस्तित्वात नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे अवघड झाले आहे. स्थानिक आमदारांनी या प्रलंबित क्रीडा प्रश्नाकडे लक्ष पुरवून नवयुवकांना तालुकास्थानी जागा मिळवून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ाक्रीडांगण नसल्याचा फटका
मुरूड शहरात सद्यस्थितीत अशी अन्य जागा दिसत नाही. तेलवडे ते खारआंबोली या परिसरात जागा उपलब्ध झाली, तर क्रीडांगण संकुल उभारले जाऊ शकते. मुरूड शहरात जागा आरक्षित करणार, असे कित्येक वर्षांपासून सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात क्रीडांगणासंबंधी कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे मुरूड तालुक्यातून उत्तम दर्जाचे क्रीडापटू तयार होत नसल्याची खंत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केली आहे.
आरक्षित खासगी जागा अधांतरी
मुरूड नगर परिषदेचे माजी नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर यांच्या मते, मुरूडमध्ये मेहनती खेळाडू आहेत; परंतु क्रीडांगण उपलब्ध नाही. नगर परिषदेच्या माध्यमातून वसंतराव नाईक कॉलेजजवळ सुमारे तीन एकर खासगी जागा आरक्षित आहे. त्या जागेवर प्रस्ताव मंजूर झाल्यास नगर परिषद चटई क्षेत्राच्या ४० टक्के वाढीव बांधकामाला भूखंडधारकांना परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. परंतु हा विषयच अधांतरी राहिला आहे.
मुरूड शहरात वा परिसरात तालुका क्रीडा संकुलासाठी किमान अडीच एकर भूखंड हवा आहे. मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी व्ही. एन. कॉलेजजवळ जागा अधिग्रहीत करण्याविषयी चर्चा सुरू आहे. मुरूड नगर परिषदेने सहकार्य केल्यास क्रीडा संकुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल.
- रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी