
समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले
मुरूड, ता. १९ (बातमीदार) ः ऐतिहासिक जंजिरा किल्ला, सुमारे अडीच किमीचा समुद्र किनारा, नबाबाचा राजवाडा, पद्मदुर्ग किल्ला, शामराज गड, खोरा बंदर, उंच डोंगरावरील श्री दत्त मंदिर, इदगाह आणि मुरूड तालुक्यातील इतर प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात.
डिसेंबर महिन्यात विशेषतः वीकेण्डला हजारो पर्यटक मुरूडमध्ये येत असून मौजमजा करीत आहेत. जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांसह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणावर येत आहेत. उत्पन्नात वाढ झाल्याने स्थानिक व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
आठवडाभरापासून किल्ला पाहण्यासाठी राजपुरी बंदरात विद्यार्थ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. समुद्रात मौजमजा करण्याबरोबरच बनाना राईड, जेट की, बंपर राई स्लीपर, घोडेस्वारी, उंटाची सफर, तसेच सायकलिंग, घोडागाडी आदींचा आनंद घेताना पर्यटक दिसतात.
किनाऱ्यालगत शहाळे, वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी आदी स्टॉल्सवर गर्दी होत असल्याने विक्रेत्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. हॉटेल्स, लॉजिंगचे बुकिंग वाढत असल्याने स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.
महोत्सवाचे वेध
जंजिऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांची वाहने मारुती नाक्यावरून एकदराकडे जाताना मच्छीमार्केटमधून जावे लागते. मात्र याठिकाणी कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. कोविडमुळे दोन वर्षे पर्यटन महोत्सव झाला नाही, यंदा स्थानिकांसह पर्यटकांना या महोत्सवाचे वेध लागले आहेत.
...............
सहलीतून विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा
रेवदंडा, ता. १९ (बातमीदार)ः मुरूड तालुक्यातील वळकेमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. महाडमधील गांधार लेणी, ऐतिहासिक चवदार तळे, प्रतापगडाचा शिवकालीन इतिहास, भौगोलिक स्थिती याबरोबर महाबळेश्वर येथील शेती, हवामान, डोंगर या विषयी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या हेतूने माहिती करून घेतली. प्रवासात गायन, नकला, गाणी याचा मनसोक्त आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. शैक्षणिक सहलीचे आयोजन मुख्याध्यापक रमेश भगत व शाळेतील शिक्षक वृंद यांनी केले होते.