
बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी
मुरूड, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील उडरगावजवळील जंगलात तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उडरगावचे रहिवासी असणारे दिलीप भोईर (वय ४५) हे सकाळी ६ च्या दरम्यान तिसले आदिवासी वाडीजवळील जंगलात लाकडे गोळा करण्याकरिता जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मानेवर हल्ला केला. या वेळी त्यांच्या मागून येणाऱ्या महिलांनी आराडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. मात्र हल्ल्याचा प्रतिकार करत असताना त्या झटापटीत दिलीप यांच्या कानाजवळ जोरदार पंजाचे एक नख मारल्याने खोल जखम झाली आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून अनेक जणांना तो दिसत आहे. त्याला जेरबंद करून अभयारण्यात सोडावे आणि जखमीला आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिक आदेश भोईर यांनी केली. वनपाल संतोष रेवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बिबट्याने हल्ला केला, हे आम्हाला माहीत नाही. कोणता प्राणी आहे, याचा तपास सुरू आहे. जखमीच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस केली.