फणसाडमध्ये १६६ प्रजातींचे पक्षी

फणसाडमध्ये १६६ प्रजातींचे पक्षी

मेघराज जाधव ः सकाळ वृत्तसेवा
मुरूड, ता. २९ ः धनेश, रंगीत तुतारी, बेडक मुखी, निळ्या चष्म्याचा मुंगशा तसेच भीमपंखी फुलपाखरे अशा पक्ष्यांसाठी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे नंदनवन ठरले असले तरी यंदा प्रथमच छोटा सुतार (यलो ब्राऊड वॉरब्लर), आफ्रिकन प्रजातीचे फुलपाखरू (सिल्हव्हर स्ट्रेक ब्लू बटरफ्लाय), निलिमा (ब्ल्यू थ्रोटेड फ्लायकॅचर), जेर्डन्स नाईट जार, सूर्यपक्षी (क्रीमसन-बॅक्ड सनबर्ड), पाणकावळा (ग्रेट कोरमोरन्ट), स्मूथ कोटेड ऑटर आदी पशुपक्षी आढळल्‍याची नोंद आहे. त्यामुळे अभयारण्यातील जैव विविधता समृद्ध झाल्‍याचे दिसून येत आहे.
ठाण्यातील उपवनसंरक्षक सरोज गवस आणि साहायक वनसंरक्षक एन. एन. कुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी, २२ ते २२ जानेवारी दरम्यान तीन दिवस पक्षी गणना करण्यात आली.
ग्रीन वर्क्स ट्रस्ट आणि वन्य जीव विभागाच्या वतीने सहावी पक्षी गणना पार पडली. या पक्षी गणनेत वन कर्मचारी, ग्रीन वर्क्स ट्रस्ट व विविध भागांतून आलेल्या पक्षीप्रेमींनी हिरिरीने सहभाग नोंदवला. त्या वेळी अभयारण्यात पक्ष्यांच्या १६६ प्रजातींची नोंद करण्यात आली.
महाराष्ट्रातील समृद्ध किनारपट्टीलगत अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर फणसाड पक्षीअभयारण्य आहे. जवळपास ५४ किलोमीटर चौरस परिक्षेत्रात विस्तारले असून याठिकाणी विविध पक्षी, प्राणी व इतर वन्यजीवांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास होत असून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
फणसाड अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून चार ते पाच वर्षांत रानगवे, रानकुत्रे आढळून आले असून त्यांची संख्या वाढत असल्याने पर्यटक व निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

फुलपाखराचे दर्शन
महाराष्ट्रात गुहागरपासून दक्षिणेला दिसणाऱ्या भीमपंखी या भारतातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे दर्शन दुसऱ्या पक्षी गणनेत झाले होते. यंदा हे फुलपाखरू पक्षी गणनेदरम्यान ५ वेगवेगळ्या ठिकाणी दिसले. शिवाय श्री ग्रास यलो, स्पॉटलेस ग्रास यलो ही दुर्मिळ फुलपाखरेही आढळून आल्याने अभयारण्य समृद्धतेकडे वाटचाल करीत असल्याने निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

जैवविविधतेच्या प्रजाती
पक्षी - १६६
सरपटणारे प्राणी - २१
उभयचर प्राणी - ८
सस्‍तन प्राणी - २०
फुलपाखरू - १७
अन्य जीव - ४३
सागरी जीव - १९

निरीक्षणासाठी मनोरे
फणसाड अभयारण्यात तब्बल २७ पाणथळे आहेत. यातील चिखलगाण पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळुन निरीक्षण करता यावे म्हणून एक खास घर बांधण्यात आले आहे. तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत.
...............

रानगव्यांचा संचार

मुरूड, ता. २९ ः फणसाड अभयारण्यात विपुल जैवविविधता असून रानगव्यांचा संचार आढळतो काही महिन्‍यांपासून रान कुत्र्यांची संख्‍या वाढल्‍याचेही दिसून आले आहे.
फणसाड अभयारण्याचे क्षेत्र निबिड जंगलाने व्यापले आहे. यात प्रामुख्‍याने बिबट्या, सांबर, वानर, रानमांजर, भेकर, रानडुक्कर, साळिंदर, पिसोरी, रानगवा आणि रानकुत्र्यांचा समावेश असून भीमाशंकर अभयारण्यात आढळणारी मोठी खार अर्थात शेकरूही इथे दिसून येतो.
भारतीय रानगव्यांची संख्या सध्या पश्चिम घाटात सर्वत्र दिसत होती. केरळपासून गुजरातमधील डांगपर्यंत यांचे अस्तित्व आढळून येते.
अभरण्यात ऑगस्ट २०१८ मध्ये सुपेगावातील ग्रामस्थांनी रानगवे असल्याचा दावा केला होता. परिसरात ७-८ रानगवे असल्‍याचे ‘आऊल’ या अशासकीय संस्थेने सप्टेंबर २०१८ मध्ये निरीक्षण नोंदवले आहे. ही संख्या चार वर्षांत वाढली असण्याची शक्‍यता संस्थेचे सचिव कुणाल साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. मध्यंतरी
वावडुंगी ग्रामपंचायतीतील जंगल भागातही कळपाने रानगवे आढळल्‍याचे ग्रामस्‍थ सांगतात. फणसाडमध्ये रानकुत्र्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com