दुर्मिळ गोरखचिंच वृक्ष अनेक शतकांपासून तग धरून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्मिळ गोरखचिंच वृक्ष अनेक शतकांपासून तग धरून
दुर्मिळ गोरखचिंच वृक्ष अनेक शतकांपासून तग धरून

दुर्मिळ गोरखचिंच वृक्ष अनेक शतकांपासून तग धरून

sakal_logo
By

मेघराज जाधव, मुरूड
वैश्विक तापमानाच्या लहरी हवामानात आजही अनेक वृक्ष वर्षानुवर्ष आपले अस्तित्व टिकवून पर्यावरणाचा समतोल राखत आहेत. त्यात गोरखचिंच हा एक दुर्मिळ वृक्ष तीन हजार वर्षांहून अधिक काळ तग धरून राहतो, अशी अलौकिक या वृक्षाची महती आहे. मुरूड-खोकरी रस्त्यावर येथील सिद्धी राज्यकर्त्यांच्या ३५० वर्षांपूर्वीच्या मकबऱ्याजवळ हे दुर्मिळ महाकाय वृक्ष १५ ते २० संख्येने तग धरून आहेत. कालानुसार या दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे बनले आहे.
जंजिरा-मुरूड या ऐतिहासिक नगरीला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. प्रदूषणमुक्त मुरूडची हिरवाई, स्वच्छ सागरकिनारे, जंजिरा, पद्मदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. २२ एकर परिसरात पहुडलेला बेलाग जंजिरा वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे. राजपुरीपासून जवळच असलेले खोकरीचे गुंबज मुगल आणि हिंदू स्थापत्य शिल्प शैलीचा मिलाप असलेले सिद्दीचे मकबरे आहेत. या दरम्यान अत्यंत दुर्मिळ ‘बाओबाब’ अर्थात गोरख चिंचेचे १५ ते २० महाकाय वृक्ष दिमाखात उभे आहेत. या वृक्षांचा बुंधा जाडसर छत्रीसारखा आहे. तर वरचाभाग हिरव्याकंच पानांनी आच्छादलेला असतो. या वृक्षाची पाने हिवाळ्यात गळून पडतात. वसंत ऋतूत पालवी फुटल्यानंतर पर्ण संभाराने झाड दाट होते. मे महिन्यात त्याला पांढरी मोठी फुले येतात. रात्रीच्या वेळी वटवाघुळ आणि निशाचरांना ही फुले खाणे अनुकूल ठरते. अलीकडे झालेल्या पर्यावरण सर्वेक्षणात जगभरात बाओबाब या वृक्षांची संख्या आफ्रिकावगळता इतरत्र देशात मर्यादित स्वरूपात आहे. या झाडाजवळ पर्यावरण विभागाकडून फलक लावल्यास पर्यटकांना याची माहिती मिळू शकेल आणि या दुर्मिळ वृक्ष गोरखचिंचेचे गुणधर्म समजतील, अशी स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाने अशा दुर्मिळ वृक्षांचे संवर्धनासाठी पुढे यावे, अशी मागणी केली जात आहे.


औषधी गुणधर्म
गोरखचिंच या झाडाला येणारी फळे माकडे चवीने फस्त करतात. म्हणून त्याला ‘मंकी ब्रेड ट्री’ असेही संबोधतात. या फळांपासून ‘क’ जीवनसत्त्व मिळते. तर त्याच्या बियांपासून खाद्यतेल काढता येते. याशिवाय सालांपासून दोरखंड, चटया, टोपल्या, कागद आणि कापडही बनू शकते. वृक्षाची मुळे ही सुद्धा औैषधी गुणधर्मयुक्त असतात.

मोहक वृक्षाचा इतिहास
संत गोरक्षनाथ याच वृक्षाच्या शीतल छायेखाली शिष्यगणांशी संवाद करत होते, अशी आख्यायिका आहे. बाओबाब या वृक्षाचे आर्युमान सुमारे किमान १ हजार वर्षाइतके असते. उंची १६ ते २९ मीटरपर्यंतची आहे. ही वृक्षे कमालीची मोहक वाटतात. भारतात हा आफ्रिकन वृक्ष इ. स. १६०० च्या सुमारास हबसाण व्यापाऱ्यांनी आणला असावा, असा तर्क आहे. जंजिऱ्यावर सिद्दीने याच सुमारास चढाई करून पाऊल टाकले.


भारतात गोरखचिंचाची झाडे खूप कमी आहेत. ही दुर्मिळ वनसंपदा प्रयत्नपूर्वक जोपासली पाहिजे; तसेच पर्यटकांना माहिती होण्यासाठी सूचनाफलक लावले पाहिजे. पर्यटकांना या दुर्मिळ वृक्षाची माहिती व्हावी, यासाठी त्यांची निगा राखली जावी. पर्यावरण विभागाकडून फलक लावले जावेत अशी अपेक्षा आहे.
- शैला महाजन, इतिहास प्रेमी तथा वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक (जळगाव)