फणसाडमध्ये मुबलक पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फणसाडमध्ये मुबलक पाणी
फणसाडमध्ये मुबलक पाणी

फणसाडमध्ये मुबलक पाणी

sakal_logo
By

मुरूड, ता. १ (बातमीदार) : काही दिवसांपासून मुरूड तालुक्यात ३३ ते ३४ अंशांपर्यंत पारा वाढला आहे. थंडीचा महिना संपला नसतानाही नागरिकांना अचानक हवामानातील बदल जाणवत आहेत. वाढत्या उकाड्याचा वन्यजीवांनाही त्रास होत आहे. अनेक ठिकाणी पाणी आटत असल्याने पशू-पक्ष्यांच्या घशाला कोरड पडत आहे. मात्र, फणसाड अभयारण्यात फणसाड व विहूर धरणासह २७ नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये बारमाही मुबलक पाणी आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांची चांगली सोय होत आहे.
मुंबईपासून १५४ किलोमीटर अंतरावर फणसाड अभयारण्य जैववैविधतेने नटलेले आहे. नवाबकालीन संरक्षित शिकार क्षेत्रात जंगल असल्याने वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी ५४ चौरस किलोमीटर क्षेत्र परिसर पूरक आहे. त्यामध्ये फणसाड गाण (अर्थात पाण्याचा साठा), सावर तलाव, सुपेगाव देवराईचा समावेश आहे. अभयारण्यात फणसाड व विहूर असे दोन धरणे आहेत. तसेच २७ नैसर्गिक पाणवठ्यांपैकी तब्बल २३ मध्ये मुबलक पाणी आहे. यातील चिखल गाणीवर २४ तासांत एकदा वन्यप्राणी पाण्याच्या शोधात येत असतात, असे मत ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या निरीक्षकांनी नोंदवले आहे. सावरा माळ, पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा या ठिकाणी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत उकाडा वाढत असला, तरी वन्य जीवांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

जैव वैविधतेने नटलेले अभयारण्य
रंगीबेरंगी पक्षी .. १६६
सरपटणारे प्राणी २१
उभयचर प्राणी ८
सस्तन प्राणी २०
फुलपाखरे १७
अन्यजीव ४३
सागरी जीव १९

घनदाट जंगलामुळे उन्हापासून संरक्षण
मुरूड फणसाड अभयारण्य परिसरात उष्णतेचा पारा ३३ अंश इतका वाढला आहे. तथापि, हा परिसर घनदाट जंगलाचा असल्याने प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण होते. पिण्याचे पाणी फणसाड धरण व विहूर धरणात मुबलक असून, नैसर्गिक पाणवठे सतत वाहत आहेत. निसर्गप्रेमी पर्यटकांनी या वनसंपदेचा तसेच येथील जैवविविधतेचा खरा आनंद घ्यावा, असे आवाहन फणसाड अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

दुर्मिळ औषधींचे माहेरघर
फणसाड अभयारण्यात ७१८ प्रकारची वनसंपदा आहे. दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे हे माहेरघर आहे. साग, किंजळ, अंजनी, सावर, जांभूळ, गेळा, कुडा, अर्जुन, कुंभा, ऐन अशी वृक्षसंपदा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जगातील सर्वांत मोठी शेंग म्हणून ओळखली जाणी गारंबीची शेंग (५ फूट) येथे पाहावयास मिळते.

कृत्रिम बशी तलावांचीही निर्मिती केली आहे. एप्रिल, मेअखेर सौरउर्जेवर चालणाऱ्या पंपांनी बशी तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. गरज भासल्यास टँकरने बशी तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाईल.
- तुषार काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी