बेलीवाडी अंधारातच ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलीवाडी अंधारातच !
बेलीवाडी अंधारातच !

बेलीवाडी अंधारातच !

sakal_logo
By

मुरूड, ता. ८ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात अनेक स्थित्यंतरे झाली. रस्ते, वीज, पाण्यासारख्या मूलभूत सोयी खेडोपाडी वाड्या-वस्त्यांवर सरकारकडून पुरवण्यात आल्या; मात्र मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी या आदिवासीवाडीत स्वातंत्र्याचा प्रकाश न पडल्याने येथील बांधवांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. अद्याप वीज पोहोचलेली नसल्याने येथील विजेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उसरोली ग्रामपंचायतीपासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात बेली आदिवासी कुटुंबे आपल्या परिवारासह अनेक वर्षे इथे वीजपुरवठ्याविना जीवन व्यतीत करत
आहेत. ४५ घरांची मिळून १८० पर्यंत लोकसंख्या आहे. आदिवासी समाज हा एकाजागी स्थिर राहू शकत नाही. वीटभट्टी वा उसतोडणीच्या कामी बाहेरगावीही स्थलांतरीत होत असतो. त्यामुळे या बेलीवाडीतील आदिवासी महिला-पुरुषांना रोजीरोटी लगतच्या मजगाव, नांदगाव, उसरोली या गावांच्या वेशीवर उदरनिर्वाहासाठी रोज जावे लागते. चार पैसे कमावल्यानंतर रात्री अपरात्री लेकरा बाळांसाठी पुन्हा बेलीवाडीला अंधार यात्रेतून परतावे लागते. मुख्यतः हा दुर्गम भाग असल्याने जंगली श्वापदांसह सरपटणारे प्राण्यांचाही आदिवासी बांधवांच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे या गंभीर समस्येकडे वीजवितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे. आदिवासी वाडीवर तातडीने वीजपुरवठा करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इथल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवा, अशी मागणी आदिवासी समाज करत आहे.

अंगणवाडीची दैनावस्था
बेलीवाडीतील अंगणवाडीची झोपडी वजा चंद्रमौळी मोडकळीस आली आहे. एकाच खोलीत साहित्य आणि तिथेच अंगणवाडी भरवली जाते. वस्तुतः शौचालय, स्नानघर हे आवश्यक असूनही ते पुरवले गेले नाही. पंचायत समितीमार्फत अंगणवाडीचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळते; पण अद्याप या बालकांच्या डोक्यावर अंगणवाडीचे छप्पर अधांतरी आहे. नांदगावच्या फ्रेण्ड ऑफ चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेने अंगणवाडी बांधून द्यायची तयारी दर्शवली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मुख्यालयाकडे बेलीवाडीचा वीजजोडणीचा प्रस्ताव पाठवला आहे. मार्च २०२३ अखेर बेलीवाडीवर वीजपुरवठा होईल.
- महादेव दातीर, कार्यकारी अधिकारी, मुरूड महावितरण