
ढगाळ हवामानामुळे आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव
मुरूड, ता. १५ बातमीदार)ः आंब्याला चांगला मोहर आल्याने यंदा बागायतदार खूष होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे मोहोर गळण्याचा प्रकार वाढला आहे. तर काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण होत आहे. अवकाळी पाऊस पडला तर मोठे नुकसान होण्याची चिंता बागायतदारांना सतावत आहे. यंदा आंबा पीक उशिरा येणार असून गतवर्षीपेक्षा ३० ते ४० टक्के उत्पादन घटणार असल्याची स्थिती आहे.
मुरुड तालुक्यात १,५९० हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड होत असली तरी १,४१० हेक्टर क्षेत्र उत्पादन क्षम आहे. त्यातून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने ६५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अस्मानी संकटामुळे
नवीन लागवड क्षेत्र वाढू शकलेले नाही. तसेही लहरी वातावरणामुळेही वर्षाआड आंब्याचे पीक हाती येत असल्याची चिंता बागायतदारांना सतावणारी आहे . तालुक्यातील साळाव, वळके, भोईघर, शिरगाव, आगरदांडा, सावली या भागात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. सध्याच्या वातावरणात मोहोर दिसत असला तरी तो फुलणारा नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यातच अवकाळीने हजेरी लावली तर आंबा उत्पादकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कोकणात पारंपारिक हापूस आंबा लागवड डोंगर उतारावर तसेच वरकस पडीक जमिनीवर केली जाते. थोडी आम्लयुक्त जमीन आंबा वाढीसाठी पोषक ठरते. पारंपरिक हापूसऐवजी रत्ना, सिंधू, पायरीसारख्या अन्य प्रजातीही विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जुन्या झाडांपासून उत्पादन कमी येत असल्याने बागांचे पुनरुज्जीवन अर्थात वेळोवेळी छाटणी होणे गरजेचे आहे. कृषी विभागाकडून हापूस आंबा क्षेत्र विस्तारीकरणासाठी विशेष जागृती केली जाते. परंतु अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने जमीन धारणा क्षेत्र मुळातच कमी उपलब्ध आहे. त्यामुळे लाभार्थी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मोहोर संरक्षण उपाययोजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याने बागायतदारांना फटका बसत असल्याचे कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यंदा आंब्याला चांगली पालवी भरपूर फुटली. मोहोर आला. मात्र सततच्या वातावरण बदलामुळे तुडतुड्या, बुरशीजन्य रोग पडल्यामुळे मोहर गळती सुरूच आहे. शिवाय अवकाळी पाऊस पडला तर आंबा बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.
- मनोज कमाने, आंबा उत्पादक, खारआंबोली
हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे तापमान दिवसा ३५ अंश सेल्सिअसच्या वर आणि रात्री १५°c च्या खाली असते. सापेक्ष आद्रतेवर परिणाम होऊन मोहर चुकणे, फळगळ होणे, फळधारणा न होणे इत्यादी परिणाम दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी शक्य असल्यास झाडाला दीडशे ते २०० लिटर पाणी द्यावे तसेच झाडाच्या बुंध्याजवळ गवताचे आच्छादन करावे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक यांच्यामार्फत आंबा व काजू बागांचे नियमित निरीक्षण करून उपाययोजना राबवाव्यात.
- मनीषा भुजबळ, कृषी अधिकारी, मुरूड