मुरूडच्या विकासाला चालना

मुरूडच्या विकासाला चालना

मुरूड, ता. ४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील मुरूड ही स्वच्छ व सुंदर नगरपरिषद आहे. मुरूड शहरात गेल्या दोन वर्षांची प्रलंबित विकासकामे राज्य सरकारकडून निधी प्राप्त करून मार्गी लावली आहेत. आता मुरूड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरविकास विभागाकडून ४० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लवकरच प्राप्त करून देणार असल्याचे प्रतिपादन अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
मुरूड शहर शिवसेना अध्यक्ष संदीप पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दळवी बोलत होते. मुरूडमधील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी झालो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माझ्या मतदारसंघाला मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. आनंद दिघे साहेबांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्मभूमीत (मुरूडला) होण्यासाठी प्रस्ताव तयार आहे. मुरूड तालुक्याचा सर्व विकास कामांचा अनुशेष भरून काढून विकासकामे पूर्ण करणार आहोत. वांद्रे व सबारकुंड धरणासाठी निधी प्राप्त व्हावा, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, अशी माहिती दळवी यांनी या वेळी दिली.
साळाव ते आगरदांडा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरच नवीन स्वरूपात बनणार असून त्याचे रुंदीकरण होणार आहे. हा रस्ता सुरू झाल्यानंतर नांदगाव येथील बाह्य वळण रस्ताही करण्यात येणार आहे. अलिबाग ज्याप्रमाणे एमएमआरडीमध्ये घेण्यात आले आहे, त्याच धर्तीवर मुरूडसुद्धा घेण्यात यावे, या मागणीसाठी मी आग्रही आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास मुरूड तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त होऊन विकासाची दालने खुलणार, असा दावा त्यांनी या वेळी केला. या वेळी सी. एम. ठाकूर, सुनील दिवेकर, जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, माजी नगराध्यक्ष अशोक धुमाळ, तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, मुख्याधिकारी पंकज भुसे, संदीप पाटील, गिरीश साळी, बाबू सुर्वे, महेश भगत उपस्थित होते.

मुरूड किनाऱ्याचे सुशोभीकरण होणार
मुरूड शहरातील विविध मागण्यांपैकी मुरूड समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरणही आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ११ कोटी ४३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याबाबतची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, लवकरच या कामाला प्रारंभ होणार आहे. समुद्रकिनारा सुशोभीकरण करताना टपरीधारकांना छोटे-छोटे गाळे याच योजनेतून देण्याचा मानस आहे, असे वक्तव्य या वेळी आमदार महेंद्र दळवी यांनी केले.

साळाव-रेवदंडा पुलाला गती
साळाव-रेवदंडा पूल याच्या दुरुस्तीसाठी अति तातडीचा निधी मंजूर केला आहे. यासाठी ८ कोटी ५० लाख रुपये मंजूर असून सध्या या पुलाचे काम जलद गतीने सुरू आहे. साळाव ते आगरदांडा रस्त्यासाठी ज्या ठेकेदाराने काम केले आहे, ते अपूर्ण असल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com