Balasaheb Thackeray Aapla Dawakhana : जनतेच्या सेवेसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana
जनतेच्या सेवेसाठी आपला दवाखाना

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana : जनतेच्या सेवेसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

मुरूड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुरूड शहरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जनतेसाठी कार्यान्वित झाला आहे. या दवाखान्याचा मुरूड-जंजिरा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या हस्ते फित कापून उद्‍घाटन करण्यात आले.

आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना पुरेपूर आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. पुढील काळात जनतेच्या सेवेसाठी आपला दवाखाना सज्ज असेल. आरोग्य प्रशासनाने मोठ्या मेहनतीने मुरूड शहरात दवाखाना उभा केला आहे. याचा पुरेपूर लाभ तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले.

आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा : भरत गोगावले
पोलादपूर
: राज्यातील जनतेला सुलभ आणि परवडणारी दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून मुंबईसह महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्याचा जास्तीत जास्त गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा, असे उद्‍गार आमदार भरत गोगावले यांनी काढले. पोलादपूर बाजारपेठेतील बाळासाहेब ठाकरे सभागृहात आपला दवाखानाचे उद्‍घाटन गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतात. त्याला अनुसरून राज्यात तालुक्याच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. याचा लाभ गोरगरीब जनतेने घ्यावा. येथे सर्व प्रकारच्या तपासण्या आणि औषध, गोळ्या मोफत दिल्या जाणार आहेत.

तज्‍ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी दरम्यान गंभीर आजार असल्यास सरकारच्या महात्मा गांधी आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, शहरप्रमुख सुरेश पवार, नगराध्यक्ष सोनाली गायकवाड, नगरसेविका श्रावणी शहा, स्नेहा मेहता, अंकिता निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन बावडेकर, डॉ, गुलाबराव सोनावणे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

तळामध्ये ऑनलाईन सोहळा
तळा : तळा शहरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले. तालुक्यामध्ये शहरी भागासाठी राज्य स्तरावरून एक आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर झाले आहे. हे केंद्र तळा शहरातील तळा-मांदाड रस्त्यावर उभारण्यात आले आहे.

त्याचा १ मे रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर खातू, डॉ. गजेंद्र मोधे यांसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.