काशीद जेटीची रखडपट्टी

काशीद जेटीची रखडपट्टी

मुरूड, ता. १७ (बातमीदार) ः मुरूड-मुंबई प्रवास सुखकर व्हावा, पर्यटनाला चालना मिळावा, यासाठी सागरमाला योजनेंतर्गत काशीदमध्ये २०१९ मध्ये जेटीचे काम सुरू करण्यात आले, मात्र चार वर्षांपासून कूर्मगतीने सुरू असलेल्‍या कामाने अद्याप गती न घेतल्‍याने पर्यटकांसह स्‍थानिकांमध्ये नाराजी आहे. जेटीचे काम पूर्ण झाल्‍यास मुंबई -काशीद समुद्र सफर पर्यटनाला उभारी देणारी ठरेल, असा विश्‍वास स्‍थानिक व्यावसायिकांकडून व्यक्‍त होत आहे.
काशीद येथे अत्याधुनिक जेटी बांधण्याच्या प्रस्‍तावास २३ जानेवारी २०१९ रोजी मान्यता मिळाल्‍यावर राज्‍य सरकारने तब्बल ११२.४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मुरूड तालुक्यातील काशीद बीच नेहमीच पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. वर्षभर देश-विदेशातील लाखो पर्यटक याठिकाणी भेट देतात. याशिवाय वीकेण्ड, सुटीच्या हंगामात काशीद बीच गर्दीने फुलून जातो.
मुंबईस्थित पर्यटकांना सध्या गेट वे ते मांडवा आणि मांडवा ते काशीद असा दोन तासांचा प्रवास करावा लागतो. प्रवासातील चढ-उतार टाळण्यासाठी आणि आरामदायी जलप्रवासासाठी थेट काशीदला जलद गतीने रो-रो प्रवासी बोटीने येणे सुलभ व्हावे आणि पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने काशीद येथे जेटी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र सरकारचा ५० टक्के निधी व राज्य शासनाच्या मेरीटाईम बोर्डाचे ५० टक्के निधीतून काशीद जेटी विकसित करण्याचे ठरले त्‍यानुसार ११२.४६ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. रायगडचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, त्‍यानंतर थोडे दिवस कामाने गती घेतली, मात्र त्‍यानंतर रखडपट्टी सुरू झाली. सद्यःस्थितीत प्रस्‍तावित जेटीच्या ठिकाणी केवळ दगडांचा खच दिसतो आहे. टे-टे स्पॉर्ट या ठिकाणी आणून ठेवले आहेत, मात्र त्‍यांची सुयोग्य मांडणी केलेले नाही. असे असले तरी मेरी टाइम बोर्डाकडून काशीद जेटीचे ६० टक्के काम झाल्‍याचा दावा करण्यात येत आहे.

जेटीचा मंजूर आराखडा
६२.१२ मीटर जेटीची उभारणी - ३ कोटी ४५ लाख ४३ हजार
पर्यटकांसाठी वाहनतळ - ६ कोटी ८१ लाख
जेटीवर जाण्यासाठी संलग्न रस्ता - ७ कोटी ३ लाख ६३ हजार
मेरिटाईम बोर्डाची टर्मिनल इमारती - १ कोटी ८ लाख
ब्रेक वॉटर बंधारा निर्मिती - ७३ कोटी ४९ लाख ८५ हजार

स्‍थानिकांना रोजगाराच्या संधी
कोरोना काळ, त्‍यानंतर आलेल्‍या चक्रीवादळामुळे जेटीसाठी बांधलेल्‍या बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्‍यामुळे ठेकेदाराने सुधारित निविदा काढण्याचा प्रस्‍ताव मांडला होता. त्‍यामुळे काही दिवस काम बंद होते. जुन्या निविदा रद्द करण्याच्या अटीवर सध्या ठेकेदाराने काम सुरू केले आहे. तांत्रिक अडचणींवर मात करत सरकारने सागरमाला योजनेंतर्गत होणाऱ्या काशीद जेटी प्रकल्‍पाला झळाळी दिल्‍यास पर्यटकांचा ओघ वाढेल तसेच स्‍थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्‍ध होईल,अशी अपेक्षा स्‍थानिकांसह व्यावसायिकांना आहे.

काशीद जेटीचे कामाला दिरंगाई झाली ही वस्तुस्थिती आहे. दोन वर्ष कोरोनामुळे काम बंद होते. त्याचप्रमाणे तोक्ते चक्री वादळामुळे पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी बांधलेला बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ठेकेदाराचे आर्थिक नुकसान झाल्‍याने काही दिवस काम ठप्प होते. त्‍यामुळे ठेकेदाराला दंडही आकारण्यात आला आहे. सध्या जेटीचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्‍न आहे.
- सुधीर देवरे, मुख्य कार्यकारी अभियंता, मेरीटाइम बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com