माथेरानमध्ये रस्त्यासाठी अश्वपालकांची श्रमदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये रस्त्यासाठी अश्वपालकांची श्रमदान
माथेरानमध्ये रस्त्यासाठी अश्वपालकांची श्रमदान

माथेरानमध्ये रस्त्यासाठी अश्वपालकांची श्रमदान

sakal_logo
By

माथेरान, ता. १४ (बातमीदार) ः शहरातील शारलोट तलाव, एको पॉईंट मार्ग तसेच हनिमून पॉईंट रस्‍त्‍याची दुर्दशा झाली असून त्यावरून पर्यटकांना व अश्वांनाही चालणे जिकरीचे झाले आहे. वारंवार सांगूनही नगरपरिषदेकडून उपाययोजना होत नसल्‍याने सोमवारी सर्व अश्वपालक रस्त्यावर उतरले आणि त्‍यांनी श्रमदानातून रस्‍ता तयार केला. त्‍यामुळे दिवसभर दरम्यान पूर्ण दिवस पर्यटकांसाठी घोडेस्‍वारी बंद ठेवण्यात आली होती.
नगरपरिषदेने येथील रस्‍त्‍याची दुरुस्‍ती केली, मात्र रस्त्याच्या दुतर्फा जांभा दगडाने उंचवटा केल्‍याने पावसाळ्यात सर्व पाणी गटारात न जाता रस्त्यावरूनच वाहून गेले. रस्त्याच्या मधोमध मोठमोठे चर पडल्‍याने दैना झाली आहे. अतिवृष्‍टीमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाल्‍याने अंदाजे एक फुटापर्यंत रस्ता खाली गेला आहे. परिणामी घोड्यांचे अपघात वाढले असून त्‍यांना इज होत आहे. याप्रकरणी अश्वपाल संघटनेकडून स्‍थानिक प्रशासनाकडे पत्र व्यवहारही करण्यात आला, मात्र त्‍याकडे दुर्लक्ष झाल्‍याने अश्वपालकांनी रस्‍ता दुरुस्‍तीचे काम श्रमदानातून पूर्ण केले.
शहरातील सर्व घोडेवाल्‍यांनी एकत्र येत सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात केली. इन्स्पेक्‍शन बंगलो ते शारलोट तलाव, एको पॉईंट मार्ग तसेच हनिमून पॉईंट रस्त्‍याचे काम या वेळी करण्यात आले. रस्त्यावर दगड बाजूला हटवून माती टाकून ते सुस्थितीत करण्यात आले आहेत.

माथेरानमधील रस्ते खराब झाले होते. नगरपालिकेने कित्येक वर्षे रस्त्‍यांची कामे केली नव्हती. याबाबत संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला, मात्र त्‍यास योग्‍य प्रतिसाद न मिळाल्‍याने श्रमदानातून रस्ता केला आहे. दिव्यांग बांधवांनाही आता रस्त्यावरून चालणे सोयीचे होणार आहे.
- आशा कदम, अध्यक्ष, स्थानिक अश्वपाल संघटना

शारलोट तलाव व शंकराच्या मंदिरात जातो, मात्र रस्ता अतिशय खराब होता. ज्‍येष्ठ नागरिक असल्याने कसेबसे दोन तास पॉइंटवर काढल्यानंतर पुन्हा माघारी फिरलो. त्या वेळी काही तरुण श्रमदानातून रस्‍त्‍याचे काम करताना दिसल्‍याने समाधान वाटले.
- आर.के. त्यागी, पर्यटक