पर्यटकांनी अनुभवला अश्वशर्यतीचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांनी अनुभवला अश्वशर्यतीचा थरार
पर्यटकांनी अनुभवला अश्वशर्यतीचा थरार

पर्यटकांनी अनुभवला अश्वशर्यतीचा थरार

sakal_logo
By

माथेरान, ता. २२ (बातमीदार) ः थंड हवेचे ठिकाण म्‍हणून २१ मे १८५० रोजी माथेरान उदयास आले. ठाण्याचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर हुज मॅलेट हे चौकमार्गे वन ट्री हिल पॉइंट चढून डोंगराच्या माथ्यावर आले. येथील थंड वातावरण अनुभवून शिकारी करत ते रामबाग पॉइंटच्या पायवाटेने चौककडे परतले. त्‍यानंतर पुन्हा काही दिवसांनी ते याठिकाणी आले आणि पहिली झोपडी बांधली. घनदाट जंगलातील निसर्ग सौंदर्याने भारावून गेलेल्‍यांनी डोंगर माथ्यावर असलेले रान म्‍हणून या ठिकाणाला ‘माथेरान’ असे नाव दिले. समुद्र सपाटीपासून ८०३.६६ मीटर उंचीवर असलेले माथेरान ब्रिटिशकाळापासून घनदाट जंगलाने वेढले आहे. १७३ वर्षांनंतरही येथील पर्यावरण अबाधित आहे. रविवारी माथेरानच्या वर्धापनदिनी पर्यटकांना अश्वशर्यतींचा थरार पाहायला मिळाला.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या वतीने ऑलिम्पिया रेसकोर्स म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात या स्‍पर्धा पार पडल्या. माथेरान हे फक्त पर्यटनस्थळ नसून हॉर्स रायडिंगचे प्रमुख ठिकाण आहे. येथील रेसकोर्सवर शहरातील प्रमुख अश्वपालकांकडून रायडिंगचे धडे दिले जातात. अनेक अश्वप्रेमी येथे हॉर्स रायडिंग शिकतात. अशा नवोदित अश्‍वचालकांची शर्यतीमध्ये परीक्षा असते. गॅलपिंग, ट्रॉटींग, म्युझिकल बॉल अँड बकेट, सॅडलिंग युअर हॉर्स, टग ऑफ व्हॉर, गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबॅक, म्युझिकल मग्स ऑन हॉर्स बँक, टॅट पेगिंग अशा स्पर्धा पुढील काही दिवस होणार आहेत. आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत, लहान मुलांसाठी सॅक रेस, मुला-मुलींसाठी फ्लॅट रेस होत असून यात पर्यटकांनाही सहभागी होता येते. रविवारी पर्यटकांसाठी रिले रेसचे आयोजन करण्यात आले होते. अश्‍वशर्यतीत जास्तीत जास्त पर्यटकांसह मुंबई-पुणे येथील घोडेस्वारांनी कसब दाखवली.
पन्नास वर्षांची परंपरा अबाधित राखत माथेरान युथ सोशल क्लबच्या वतीने तत्कालीन अध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या संकल्पनेतून अश्व शर्यतीचे आयोजन होत असते. दिवाडकर यांच्यानंतर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रशाम दिवाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या शर्यतीचे आयोजन केले जाते. यंदा रविवार असल्‍याने शर्यतींमध्ये सहभाग घेण्यासाठी मुंबई, पुण्यातून अनेकजण आले होते. शर्यतीत घोडेस्वार संदीप शिंदे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

माथेरानमध्ये कुटुंबासह फिरण्यासाठी आलो होतो. याठिकाणी आल्‍यावर शहराचा वर्धापनदिनानिमित्त अश्वशर्यतींनी होणार असल्‍याचे समजल्‍याने त्‍या पाहण्यासाठी आलो. ब्रिटिशकालीन रेसकोर्स, सभोवती गर्द हिरवी झाडी पाहून मन भारावून गेले. लहान मुले, आदिवासी बांधवांसह जॉकीचा पोशाख परिधान केलेले अश्वचालकांबाबत विशेष अप्रूप वाटले. त्‍यामुळे दरवर्षी २१ मेला याठिकाणी येण्याचा प्रयत्‍न असेल.
- सुमित शिरसाट, पर्यटक