पर्यावरणपूरक ई-टेम्‍पोची प्रतीक्षा

पर्यावरणपूरक ई-टेम्‍पोची प्रतीक्षा

अजय कदम, माथेरान
माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने स्थानिकांना घरगुती व अन्य साहित्याची वाहतूक करताच अनेक अडचणींसह आर्थिक भारही सहन करावा लागतो. यासाठी हातगाडीचा वापर बहुतांश करावा लागत असून किमान तीन ते चार किलोमीटरपर्यंत ही गाडी ओढत न्यावी लागते. माथेरानमध्ये इ-रिक्षाची चाचणी झाली असून लवकरच त्‍यांची सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्‍याचप्रमाणे मालवाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इ-टेम्पोची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील व्यापारी तसेच नागरिकांकडून होत आहे.
माथेरानमध्ये मालवाहतुकीसाठी वर्षोनुवर्षे हातगाडीचा उपयोग केला जातो. ८ मे १९७४ च्या दरम्यान तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांच्या काळात रेल्वे कामगारांचा संप झाला होता. त्या वेळी माथेरानची दळणवळण व्यवस्था बंद झाल्याने माथेरानकरांनी श्रमदान करून नेरळ-माथेरान रस्ता तयार केला. त्यानंतर १९७८ च्या दशकात नेरळ-माथेरान टॅक्सी सेवा सुरू झाली. १९८५ मध्ये मालवाहतुकीकरिता ट्रेन सुरू झाली. परंतु जो-तो व्यापारी मालवाहतूक दस्तुरी नाक्यापासून पुढे माथेरानपर्यंत डोक्यावर घेऊन करू लागला. १९९० च्या दशकात रेल्वेने गाडी बंद केल्‍याने मालवाहतुकीला ब्रेक लावला. तेव्हापासून माथेरानमधील बांधकाम साहित्यापासून हॉटेल आणि घरगुती वापराच्या वस्तूंची वाहतूक हातगाडीतून सुरू झाली आहे.
प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ ही माथेरानची ओळख आहे. दस्तुरी नाक्यापासून पुढे शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असल्याने दस्तुरी नाक्यापुढील वाहतूक मनुष्यबळ किंवा हातगाडीच्या साह्याने केली जाते. परंतु ही प्रथा अमानवीय असून अशोभनीय असून गेल्‍या काही वर्षांत हातगाडी ओढणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे.
एकीकडे सरकार माथेरान पर्यटनस्थळाचा विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देत आहे. परंतु दुसरीकडे दस्तुरी नाक्यापासून वाहतुकीच्या समस्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. त्‍यामुळे या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

जीवनावश्‍यक वस्‍तूंचे दर चढे
माथेरानचा विकास साधून वाहतुकीच्या समस्यांवर सरकारने तोडगा काढावा. पर्यावरण पूरक ई-टेम्पोला परवानगी द्यावी, अशी मागणी स्‍थानिकांकडून धरत आहे. स्थानिकांना सामानाची वाहतूक डोक्यावरून करावी लागते. माथेरानची मालवाहतूक समस्या सुटून स्थानिकांना जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात घरापर्यंत उपलब्ध होतील, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com