रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडी दूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडी दूषित
रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडी दूषित

रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडी दूषित

sakal_logo
By

उरण, ता. २७ (वार्ताहर) ः उरण तालुक्यात औद्योगीकरण झपाट्याने वाढत आहे. कंपन्‍या वाढल्‍याने प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. दूषित पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले जात असल्‍याने मत्‍स्‍यजीवांना धोका निर्माण झाला आहे.
उरण तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक प्रकल्पांतील दूषित, रसायनमिश्रित पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे नागाव, जसखार, धुतूम, चिर्ले, बांधपाडा, भेंडखळ ग्रामपंचायत क्षेत्रांतील खाडीकिनारी मासे मृत्‍युमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडतात. परिणामी स्‍थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नागाव व जेएनपीटी परिसरात समुद्रात, नाल्यांत ज्वलनशील पदार्थांमुळे आगीच्या घटना घडल्‍या आहेत.
सध्या भेंडखळ आणि बांधपाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील कंटेनर यार्ड व्यवस्थापनाकडून खाडीत विषारी, रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येत आहे. त्‍यामुळे काही दिवसांपासून खाडीतील, नाल्यातील विविध जातींचे मासे मुत्युमुखी पडत आहेत. मेलेल्या माशांमुळे व खाडीतील रसायनमिश्रित पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. उग्र वासाने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भेंडखळ गावातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

नुकसानभरपाईची मागणी
खाडीतील मासेमारीवर उदरनिर्वाह चालणाऱ्या मच्छीमार कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असून उग्र वासाने किनारपट्टीलगतच्या रहिवाशांच्या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रकरणी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण आयुक्त व रायगड जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी भेंडखळ गावातील सामाजिक कार्यकर्ते हरेश सुरेश पाटील यांनी केली आहे.

रसायनमिश्रित पाणी खाडीत सोडण्यात येत असल्‍यास त्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. शिवाय संबंधित ग्रामपंचायतीनेही लक्ष देत वरिष्‍ठ पातळीवर तक्रार करावी. तालुक्‍याच्या महसूल विभागाकडे जो भाग येतो, तेथील चौकशी करून कार्यवाही केली जाईल.
- जे. बी. धुमाळ, नायब तहसीलदार, उरण.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80159 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top