
पादचारी जोड पुलावरील छप्पर हवे!
धारावी, ता. २७ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेच्या माहीम स्थानकाकडे जाण्यासाठी धारावीतून राजर्षी शाहूनगर येथून पादचारी पूल आहे. हा पादचारी पूल गेल्या काही वर्षांपूर्वी स्थानकाला जोडला आहे. या जोडपुलावर छप्पर टाकलेले नाही. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात कडक उन्हात व पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य पुलावर छप्पर घालू नये, अशी नागरिकांची मागणी आहे, मात्र जोडपुलावर छप्पर घालावे, अशी मागणी केली जात आहे.
शेकडो प्रवासी दररोज इथून ये-जा करतात. पूर्वी प्रवाशांना स्थानकात जाण्यासाठी स्थानकाला वळसा घालून जावे लागत होते. यामुळे प्रवाशांना धावपळ करत गाडी पकडावी लागत होती. स्थानकात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्चून पूल उभारला असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे; पण पुलावर छत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. मुख्य पुलावर छत बनवू नये, नाहीतर फेरीवाले पथारी पसरून बसण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वेला जोडलेल्या पुलावर छत बनवले पाहिजे. तिथेही फेरीवाले, भिकारी बसू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा शाहू नगर येथील रहिवासी अजित साळुंखे यांनी व्यक्त केली.
...
माहीम पूर्व पश्चिम असा जोडणाऱ्या मुख्य पादचारी पुलावर छप्पर नसावे. कारण भिकारी, गर्दुल्ले आदी लोक तिथे वास्तव्य करतील. तसेच लूटमार होऊ शकते, पण मुख्य पादचारी पुलावरून स्थानकात जाणाऱ्या पुलावर छप्पर असले पाहिजे.
- अभय देठे, अध्यक्ष, अभयभाऊ प्रतिष्ठान.
...
मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यासंदर्भात माहिती घेतो. लोकांची मागणी असेल तर तसा विचार करू.
- मनोज परिहार, स्थानक व्यवस्थापक, माहीम स्थानक.
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80168 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..