लसीकरणामुळे केवळ सहा टक्के मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine
लसीकरणामुळे केवळ सहा टक्के मृत्यू

लसीकरणामुळे केवळ सहा टक्के मृत्यू

मुंबई : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी झाल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांनी काढला आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयाने यासाठी नऊ हजार ८९३ रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास केला होता. त्यापैकी केवळ ५.९६ टक्के पूर्ण लसीकरण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता.

कोविड लसीकरण झाल्यानंतरही कोरोना संसर्ग होणे म्हणजे ब्रेक थ्रू संसर्ग. लसीकरण झाल्यानंतर संसर्ग झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय अभ्यासासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयाने नऊ हजार ८९३ नमुन्यांचा अभ्यास केला होता. १ जुलै २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२० दरम्यान करण्यात आलेल्या अभ्यासासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल-हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीममधून मिळालेल्या डेटाचाही आधार घेण्यात आला.

वैद्यकीय अभ्यासातील निष्कर्षानुसार कोविड लसीकरणामुळे मृत्यूचा धोका ९४ टक्क्यांपर्यंत कमी होतो. लसीकरण न केलेल्या प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अंशतः लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये डिस्चार्ज दर ९३.४५ टक्के आहे. एकच डोस घेतलेल्या १,४०५ रुग्णांपैकी ९८ (६.५२ टक्के) जणांचा मृत्यू झाला; तर पूर्ण लसीकरण झालेल्या चार हजार ४२९ रुग्णांपैकी २८१ (५.९६ टक्के) जणांचा मृत्यू झाला आणि ३,६८६ लसीकरण न झालेल्या रुग्णांपैकी ७४५ (२०.२१ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला.

ब्रेकथ्रू संसर्गाची बहुतेक प्रकरणे सौम्य किंवा लक्षणे नसलेली होती. तसेच त्यांना इतर कोणताही संसर्ग नव्हता. सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलच्या माहितीनुसार लसीकरण केलेल्यांमध्ये आजारी पडण्याची शक्यता खूपच कमी असते.
- डॉ. बाळकृष्ण अडसूळ, अधिष्ठाता, सेव्हन हिल्स रुग्णालय

लसीकरण झालेले असूनही काही जणांना कोरोना संसर्ग झाला. तरीही लसीकरणामुळे कोरोनापासून मिळणाऱ्या संरक्षणाचे प्रमाण अधिक आहे. तसेच दोन्ही डोस घेतल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होते.
- डॉ. स्मिता चव्हाण, अतिरिक्त अधिष्ठाता, सेव्हन हिल्स रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80225 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top