
भोंग्याप्रकरणी अंबरनाथमधील मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा
अंबरनाथ : हनुमान चालिसा पठण करण्यासाठी काही ठिकाणी भोंगे लावण्याची परवानगी मागितल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शहरातील मनसेच्या शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या. पश्चिम भागातील कैलासनगर, फातिमा हायस्कूल, कोहोजगाव, भेंडीपाडा आणि मटका चौक आदी ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी मिळावी, त्याचप्रमाणे अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने २७ एप्रिलला अंबरनाथ पोलिसांकडे करण्यात आली होती.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या या मागणीनुसार अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, प्रफुल सूर्यराव, प्रशांत नलावडे यांना फौजदारी दंडप्रक्रिया संहितेनुसार कारवाई करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे, तोपर्यंत समाजात तेढ निर्माण होऊन जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या नोटिशीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोते यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80245 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..