
१५ हजार वीज ग्राहक
तळोजात महावितरणकडे अपुरे मनुष्यबळ
कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
खारघर, ता. २८ (बातमीदार) : तळोजा फेज एक वसाहतीत पंधरा हजार वीजग्राहक असून केवळ दोनच कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची काम करताना तारांबळ उडते. महावितरणने तळोजा परिसरात वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी तळोजावासीयांकडून करण्यात येत आहे.
खारघरनंतर सिडकोने तळोजा वसाहत निर्माण केली. सिडकोने २०११ ला बेलापूर-पेंधर मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केल्यामुळे सिडको, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडावर विकसकाने अनेक गृहप्रकल्प सुरू केले. दरम्यान, घरे घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने महावितरणने तळोजा वसाहत आणि लगतच्या गावासाठी सबस्टेशन सुरू करून दोन वायरमनची नियुक्ती केली.
दहा वर्षांत तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली असून पंधरा हजार वीजग्राहक आहे. त्यात विजेचा लपंडाव, परिसरात वीजवाहिन्या, सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यास तसेच इमारतीमध्ये विजेची समस्या निर्माण झाल्यास दोघा कर्मचाऱ्यांना चोवीस तास काम करावे लागते. एकाच वेळी दोन ठिकाणी वीजवाहिन्यांत बिघाड झाल्यास त्यांची तारांबळ होते. त्यामुळे महावितरणने तळोजा फेज एकमधील सबस्टेशनमध्ये अधिक वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी तळोजावासीयांकडून होत आहे.
तळोजा, नावडे परिसरात तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तळोजा फेज एक वसाहतीत कमी मनुष्यबळ असेल तर माहिती घेऊन पुढील उपाययोजना केली जाईल.
- सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण पनवेल.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80291 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..