
घोडबंदर रस्त्यावर ट्रकला अपघात
ठाणे, ता. २८ ः घोडबंदर रस्त्यावरून ठाण्याकडे सात टन भंगार साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रक उलटल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गायमुख गावाजवळ घडली. उलटलेल्या ट्रकमधील भंगार साहित्य पडल्याने ठाण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक विस्कळित झाली. साधारणपणे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तातडीने ट्रक आणि भंगार बाजूला केल्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.
हरीश सोनी याच्या मालकीचा ट्रक चालक ओमप्रकाश तिवारी हा दमनवरून ठाण्याकडे सात टन भंगार साहित्य घेऊन येत होता. तो घोडबंदर रोडवरील गायमुख गाव येथून गुरुवारी सकाळी ८.४५ ते ९ वाजण्याच्या सुमारास जात असताना अचानक चालक तिवारी याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक घोडबंदर रोडवरील ठाण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर उलटला. रस्त्याच्या मधोमध उलटलेला ट्रक आणि त्यामधील भंगार साहित्य रस्त्यावर पसरल्याने त्याचा परिणाम त्या मार्गिकेवरील वाहतुकीवर झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, गायमुख वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. तसेच हायड्रा मशीनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला, वाहतूक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या साह्याने रस्त्यावर पडलेले भंगार साहित्य बाजूला करण्यात आले आहे. त्यानंतर घोडबंदर रोडवरील ठाण्याकडे येणारी मार्गिका सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळी करण्यात आली आहे; या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.
ट्रक उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तातडीने ट्रक आणि त्यातील माल बाजूला केला. यासाठी अर्धा तास लागल्याने साधारणपणे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रक आणि त्यातील साहित्य बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
- संदीप सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कासारवडवली वाहतूक उपशाखा, ठाणे शहर
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80315 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..