
पनवेलमध्ये हरितक्षेत्र वाढणार
पनवेल, ता. २८ (बातमीदार) : महापालिका क्षेत्रात प्रभाग १९ मध्ये कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे लावणारी जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्याच्या प्रकल्पाला विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. यासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यात येणार असून महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे परिसर हिरवागार तर होईलच शिवाय पशूपक्षांचा अधिवास वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
पनवेल महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त कैलास गावडे आदी उपस्थित होते.
पूर्वाश्रमीच्या नगरपरिषदेमार्फत सहा वाणिज्य संकुलातील ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेले गाळे लीज करारनामा व हस्तांतर करणे या विषयाला मान्यता देण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. यावेळी सहा व्यापारी संकुलातील ३५५ व्यापारी गाळे विद्यमान गाळेधारकांस तत्कालीन नगरपरिषद कायद्याप्रमाणे निविदा पद्धतीने व आरक्षणानुसार वाटप केल्याची माहिती उपायुक्तांनी दिल्यावर त्याला नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचा विरोध नोंदवून मान्यता देण्यात आली.
रोटरी क्लब करणार झाडांची देखभाल
पनवेल महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड क्रमांक २७३ हा डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ, पनवेल सेंट्रलला देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यात हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी पालिका कोणताही मोबदला देणार नाही. वृक्षारोपणाच्या आराखड्यास महापालिकेची परवानगी घ्यायची असून झाडांची देखभाल अकरा महिने रोटरी क्लबने विना मोबदला करायची आहे.
भूखंड क्रमांक २७३ हा उद्यानासाठी राखीव होता. तो रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी देण्यास मंजुरी दिली. सध्याच्या काळातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा डेंस ग्रीन मियावाकी फॉरेस्टचा प्रोजेक्ट आहे. यामुळे पनवेलमध्ये हरित क्षेत्राबरोबरच पशूपक्ष्यांचा अधिवासही वाढेल.
- परेश ठाकूर, सभागृह नेते
महापालिका क्षेत्रातील व्यापारी संकुलच्या विषयाला मंजुरी दिली आहे. माझे वडील जे.एम. म्हात्रे पनवेल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते, त्यावेळी याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्यामुळे पनवेलमधील नागरिकांना गाळे मिळू शकले. अरविंद म्हात्रे यांना आवश्यक प्रशासनाकडून पुरेशी माहिती न दिल्यामुळे त्यांनी विरोध केला. मात्र योग्य माहिती दिल्यानंतर त्यांचा विरोध मावळला.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते
सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला साधारण दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढतात आणि अव्याहत प्राणवायू देतात. यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे लावता येतात. प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80344 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..