
वाशीत अत्याधुनिक सिनेमागृह उभारण्याची मागणी
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : वाशी येथील मेघराज-मेघदूत चित्रपटगृह जमीनदोस्त करून त्या ठिकाणी विकासक व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारत आहे. वाशी गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कॉम्प्लेक्सला विरोध दर्शवला आहे. तसेच या भूखंडावर विकासकाने नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक सिनेमागृहच उभारावे, अशी मागणी केली आहे.
वाशी येथे असलेले सर्वांत जुने मेघराज-मेघदूत सिनेमागृह जमीनदोस्त करण्यात आले आहे. या ठिकाणी व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाशी गावातील ग्रामस्थ विरोधासाठी एकवटले आहेत. ओबीसी नेते राजाराम पाटील, दीपक पाटील, जयेश आकरे, सुनील पाटील, शैलेश घाग आदींनी गुरुवारी (ता. २८) सिनेमागृहाच्या जागेवर पाहणी दौरा केला. या वेळी वाशी गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील सर्वांत जुन्या करमणुकीसाठी असलेल्या सिनेमागृहाच्या वास्तूत नवी मुंबईतील नागरिकांच्या आठवणींचा ठेवा असल्याने ती वास्तू समूळ नेस्तनाबूत करणे म्हणजे अवलक्षण ठरेल, अशी आपली प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
महापालिकेने परवानगी देऊ नये
सामान्यांसाठी करमणूक व सांस्कृतिक वापरासाठी सिडकोने दिलेल्या भूखंडावर व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारून नवी मुंबईतील नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. महापालिकेने येथे उभारण्यात येत असलेल्या बांधकामाला परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80347 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..