
आरटीपीसीआर व ॲन्टीजन चाचण्या वाढवा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेच्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज आढावा घेतला. सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. शहरात लसीकरणाबरोबरच आरटीपीसीआर व अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरीदेखील नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे कोरोनासंदर्भात महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सुविधांबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपआयुक्त मनीष जोशी, उपआयुक्त मारुती खोडके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव आदी उपस्थित होते. कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये, तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. रुग्णवाहिका, ऑक्सिजन पुरवठा, ऑक्सिजन बेड यांची उपलब्धता ठेवणे, अँटीजेन व आरटी-पीसीआर चाचण्या करणे तसेच औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागास आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80400 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..