सहकार समाधान…घरात जाण्यास अडकाठी योग्य नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार समाधान…घरात जाण्यास अडकाठी योग्य नाही!
सहकार समाधान…घरात जाण्यास अडकाठी योग्य नाही!

सहकार समाधान…घरात जाण्यास अडकाठी योग्य नाही!

sakal_logo
By

सहकार समाधान

घरात जाण्यास आडकाठी योग्य नाही!

प्रश्न ः माझ्या पत्नीची आई एका सहकारी गृहनिर्माण संस्थेची सभासद होती. पत्नीच्या आईचे निधन झाले, आईने पत्नीच्या नावे इच्छापत्र केले, तसेच नामनिर्देशन पत्र ही केले; परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदनिकेच्या दारावर नोटीस लावून पत्नीला, तसेच तिच्या पतीला-मला व नातेवाईकांना सदनिकेमध्ये जाण्यास मज्जाव केला आहे, यासंबंधी आम्ही काय करावे?
- श्रीनिवास राव, पुणे
उत्तर ः संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकारी समितीचे अधिकार हे संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार नियमित केले आहेत. संस्थेच्या सभासदाच्या निधनानंतर सदनिका बंद करण्याचे वा नातलगांना आडकाठी करण्याचे कोणतेही अधिकार उपविधीनुसार समिती पदाधिकाऱ्यांना नाहीत. अशा परिस्थितीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काही शंका असल्यास पोलिस यंत्रणेमार्फत किंवा सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार सदनिका वापरण्यास मज्जाव करता येईल. तसेच सदनिकेच्या चाव्या व आवश्यक ती ओळख इत्यादी असल्यास अशा नातेवाईकांना, पत्नीला, तिच्या पतीला मज्जाव करणे बेकायदा आहे. असे अधिकार महाराष्ट्र सहकारी कायदा किंवा उपविधीनुसार समिती सदस्य-पदाधिकारी यांना मिळत नाहीत. हे झाले कायद्याचे विवेचन, आता यामधील कार्यवाही करण्याची व्यवस्था सांगणे आवश्यक आहे. पत्नीच्या नावे आईने नामनिर्देशन पत्र केले असल्याने त्याच्या आधारे प्रथम नामनिर्देशनाच्या अधिकारान्वये सभासदत्वाचा अर्ज करून त्या संस्थेचे सभासदत्व मिळवावे. सहकारी संस्था कायदा कलम 154 b13 च्या अंतर्गत असे सभासदत्व मिळण्याची तरतूद आहे. सदनिका मुंबई विभागामध्ये असल्यास इच्छापत्राच्या आधारे उच्च न्यायालयामध्ये अर्ज करून इच्छापत्राच्या अंतर्गत असलेल्या मालमत्ता ज्या लाभार्थीला मिळणार आहेत, त्याच्या नावे आदेश घ्यावेत. ते संस्थेत सादर करून कायम सभासदत्व घ्यावे, जेणेकरून त्या सदनिकेत संबंधित सर्व व्यवहार करणे त्या व्यक्तीला कायदेशीररीत्या सोयीचे होईल. पदाधिकारी वा समिती सदस्यांची मनमानी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या निदर्शनास लेखी तक्रार करून आणावी. त्यासंबंधी योग्य शासन होत नाही तोवर त्याचा पाठपुरावा करावा. म्हणजे पुन्हा अशी मनमानी इतर सभासद किंवा नातलगांना भोगावी लागणार नाही.

प्रश्न ः मी मुंबईतील एका सहकारी संस्थेचा सभासद असून संस्थेची सदस्य संख्या 250 च्या आतील आहे. संस्थेत निवडणूक घेण्याचा निर्णय झाला आहे, परंतु वृत्तपत्रामधील बातमीच्या आधारे अशी चर्चा आहे की संस्थेची निवडणूक, सहकार तालिकेवरील निवडणूक अधिकाऱ्याकडून घेण्याची आवश्यकता नाही, हे खरे आहे का?
- अशोक मगर, नायगाव.
उत्तर ः सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका या संबंधित नियम व अटी-शर्ती यांच्या आधारे होणे आवश्यक आहे. याच नियमानुसार सहकार निबंधक यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची यादी मंजूर केली आहे. निवडणुका घेण्यासाठी या मंजूर यादीतील निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याचे अधिकार संस्थांना दिले आहेत. तसे नवीन नियम करण्यात आले आहेत; परंतु सहकार मंत्र्यांना एका जाहीर विधानानुसार, तसेच काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार शासन असा विचार करत आहे की ज्या संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या संस्थेतील एखाद्या सभासदाला निवडणूक अधिकारी नेमून घ्याव्यात. अर्थात तो सदस्य थकबाकीदार नाही व त्याची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही याची खातरजमा झाली पाहिजे; परंतु याबाबत आजपर्यंत निवडणूक नियमांमध्ये बदल झाले नाहीत. तसेच त्याबाबत आदेशही काढण्यात आले नाहीत. त्यामुळे सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार निवडणूक घेणे योग्य राहील.

- शरदचंद्र देसाई, वकील, सहकार न्यायालय.

वाचकांनी या सदरासाठी आपले सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80433 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top