
‘प्रभात’च्या कार्याला सलाम
शुभांगी पाटील, तुर्भे
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : हातावर पोट असणाऱ्या नाका कामगारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. रोजची कमाई आणि रोजचा उदरनिर्वाह, हाच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र. कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत, परंतु असंघटित क्षेत्रातील नाका कामगार कायमच दुर्लक्षित राहिला आहे. या दुलर्क्षित घटकाला मध्यवर्ती घेऊन प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था २०११ पासून कार्यरत असून कामगारांच्या न्यायासाठी नेहमीच आवाज उठवते.
सौर ऊर्जेवर आधारित पहिल्या फिरत्या नेत्रालयाद्वारे संस्थेने नवी मुंबईतील नाका कामगारांना मोफत चष्मा देऊन नेत्र सेवा नियमितपणे उपलब्ध करून देते. यामध्ये टेलिमेडिसीनचाही वापर केला जातो. डोळ्यांना आघात होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता तसेच डोळ्यांना आघात झाल्यास प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन केले जाते. डोळ्यांच्या आजारांवर औषध उपचार व गरजेनुसार शस्त्रक्रियाही केल्या जातात.
गेल्या तीन वर्षांत प्रकाश रथाद्वारे पाच हजारांहून अधिक नाका कामगारांची नेत्रतपासणी करून मोफत चष्मा वाटप केले आहे, तसेच अंधत्व आलेल्या कामगारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नवदृष्टी प्राप्त करून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने नाका कामगारांसाठी प्रकाशाचा किरण ठरला आहे. नाका कामगारांना डोळ्यांसह इतरही आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच प्रभात ट्रस्टद्वारा नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली येथील समाज मंदिरामध्ये कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी केंद्र सुरू केले आहे. यात रक्तदाब, रक्त गट, पल्स, ऑक्सिजनचे प्रमाण, शरीराचे तापमान, सामान्य परीक्षा, रक्तातील साखरेचे प्रमाण, ईसीजीसारख्या मूलभूत आरोग्याच्या तपासण्या व औषध उपचार मोफत केले जातात.
प्रतिबंधात्मक वार्षिक आरोग्य तपासणी करण्यास नाका कामगार असमर्थ असल्याने त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. यासाठी नाका कामगारांना आरोग्य ओळखपत्र देण्यात येत आहे. याद्वारे प्रभात ट्रस्टद्वारा संचलित बाह्यरुग्ण विभागामध्ये मोफत औषध उपचार घेऊ शकता. प्राथमिक आरोग्य तपासणीमध्ये हृदय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा विविध गंभीर आजारांची लक्षणे कामगारांमध्ये दिसून येत आहेत. यासाठी विशेषज्ज्ञ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा मानस आहे.
- डॉ.आश्लेषा थोरात, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वार्षिक आरोग्य तपासणी केंद्र
फिरता नोंदणी सहायता कक्ष
केंद्र सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. मात्र बहुतांश नाका कामगार अशाप्रकारे नोंदणी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम नाही, ही बाब लक्षात घेऊन प्रभात ट्रस्टच्या वतीने हा फिरता नोंदणी साहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे. कक्षाच्या माध्यमातून नवी मुंबईतील विविध नाक्यांवर दररोज सकाळी ८ ते १० या वेळेत योजनेचा प्रचार, प्रसार करून समाजातील सर्वात उपेक्षित घटकाला मोफत नोंदणी करणे शक्य झाले आहे. तसेच कामगारांच्या नोंदणी कार्डसाठी विनर्स क्लबद्वारे जॉय ऑफ गिव्हिंगच्या माध्यमातून सर्व प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती प्रभात ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन जमादार यांनी दिली.
सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न
संस्थेच्या माध्यमातून कामगारांसाठी सर्वंकश कार्य करण्याचा मानस असून यासाठी समाज घटकांचा सहयोग अपेक्षित आहे. यासाठी ‘वाढदिवस तुमचा... आनंद सर्वांचा...’ या उपक्रमाअंतर्गत वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नाका कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाद्वारे आपला किंवा आपल्या मित्र- मैत्रिणी, पत्नी, मुलगा, आई, वडील, आजी, आजोबा इत्यादी आप्तेष्ट यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपणही सहभागी होऊ शकता, संस्थेला प्राप्त देणगीसाठी आयकर विभागाच्या ८० जी अंतर्गत सवलत प्राप्त असल्याची माहिती संस्थापक पंकज नाथाला यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80502 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..