
जुगार पार्लरवरील धाडीप्रसंगी भीतीमुळे हृदयघाताने मृत्यू
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) ः मुलुंडमधील पार्लरमध्ये जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्यासाठी गुरुवारी (ता. २८) रात्री पोलिसांच्या समाजसेवा शाखेने धाड टाकली. या वेळी या धाडीच्या कारवाईत भीतीपोटी एका ग्राहकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या धाडीत ११ जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांतीलाल कोथमिरे यांनी सांगितले.
मुलुंड पश्चिम येथील असलेल्या संगम व्हिडीओ गेम पार्लरवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने टाकलेल्या धाडीत दिलीप तेजपाल या ग्राहकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. या आधारावर या शाखेच्या पोलिसांनी पार्लरवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. त्या वेळी दिलीप हा पार्लरमध्ये जुगार खेळत होता. अचानक पार्लरवर पोलिसांची धाड पडल्यामुळे दिलीप याच्या छातीत कळ आली आणि तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला पोलिसांनी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी दिलीपला मृत घोषित केले, अशी माहिती परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80515 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..