उन्हाळी सुट्यांना सुरुवात, समर कॅम्पची पुन्हा धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाळी सुट्यांना सुरुवात, समर कॅम्पची पुन्हा धूम
उन्हाळी सुट्यांना सुरुवात, समर कॅम्पची पुन्हा धूम

उन्हाळी सुट्यांना सुरुवात, समर कॅम्पची पुन्हा धूम

sakal_logo
By

पूजा पवार : ठाणे

मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्या की चिमुकल्यांना वेध लागतात ते ‘समर कॅम्प’ म्हणजेच उन्हाळी शिबिरांचे. सुट्यांच्या काळात उन्हाळी शिबिरांमध्ये जाऊन चिमुकले तेथील नाच-गाणी, व्यक्तिमत्त्व विकास, साहसी खेळ, चित्रकला, हस्तकला, लेखन, भाषा अशा विषयांवरील विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊन उन्हाळी सुटीतील काही दिवस आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत अगदी मजेत घालवत असतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संसर्गामुळे या उन्हाळी शिबिरांना ब्रेक लागला होता, मात्र आता कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे यंदा पुन्हा ठाण्यातील शाळा आणि संस्थांकडून उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षानंतर शिबिरांमध्ये धम्माल करायला मिळणार असल्याने चिमुकले देखील सहभागी होण्यासाठी उत्साहित असून, या वर्षी उन्हाळी शिबिरांना पालक आणि विद्यार्थी वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता ठाण्यातील काही शाळांमध्ये उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात असणाऱ्या आर. जे. ठाकूर विद्यालयात २२ ते ३० एप्रिल आणि १ जून ते १३ जून अशा दोन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या शिबिरात निबंध लेखन, संभाषण, कथाकथन, मनाचे श्लोक, पारंपरिक खेळ असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. ठाकूर शाळेत झालेल्या या शिबिराला सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चिमुकल्यांना रंजक पद्धतीने विज्ञानाची ओळख व्हावी, दैनंदिन जीवनातील विविध घटनांमागील विज्ञान त्यांना समजावे, या उद्देशाने शहारातील सरस्वती मराठी माध्यमाच्या शाळेकडून मे महिन्यात विज्ञानावर आधारित उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली आहे.

मामाचे गाव, हिमालयीन ट्रेक अन्‌ बरंच काही...
ठाण्यातील ‘रुसटिक हॉलिडेज’ या टूर संस्थेकडून ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी उन्हाळी सुटी लागली की मामाच्या गावाला जाण्याचे, तेथील गावच्या घरात राहण्याचे आणि पारंपरिक पदार्थांवर ताव मारण्याचे भलतेच आकर्षण लहान मुलांना असायचे; परंतु शहरीकरण आणि धकाधकीचे आयुष्य आदींमुळे मामाच्या गावाला जाण्याची ओढ किंवा गाव ही संकल्पनाच लहान मुलांच्या स्मरणातून काहीशी पुसली गेली आहे. तेव्हा चिमुकल्या मुलांना गावाकडच्या गोष्टींची माहिती व्हावी, ते निसर्गाच्या जवळ जावेत, या उद्देशाने रुसटिक हॉलिडेजकडून यंदा २ मे ते ७ मे दरम्यान ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील ‘तुरळ’ गावात हे उन्हाळी शिबिर घेण्यात येत असून शहरी भागातील मुलांना गावाकडील मातीच्या घरात राहणे, लाठीकाठीचा खेळ, तेथील पारंपरिक खाद्य, शेतीची माहिती, पारंपरिक खेळ, हौदात पोहणे, आयुर्वेदिक झाडांची माहिती, डोंगरांवर भटकंती, गायीचे गोठे, कुक्कुटपालन आदी निसर्ग संपन्न आणि गावाकडील आपुलकीचा अनुभव या उन्हाळी सुटीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जाणार आहे. साधारण १५ वर्ष आणि त्याहून लहान वयोगटापर्यंतच्या २० मुला-मुलींचा यात सहभाग असतो.
ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टकडून कोरोना काळानंतर प्रथमच विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत हिमालयीन ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. ही ट्रेक १० मे ते १८ मे या दरम्यान होणार असून यात विद्यार्थ्यांना हिमालयातील साहसी खेळ, ट्रेकिंग अशा अनेक गोष्टींचा अनुभव करून दिला जाणार आहे.

विशेष मुलांच्या गुणात्मक वाढीसाठी शिबिर
ठाणे शहरातील घोडबंदर येथील यश फाऊंडेशन स्पेशल स्कूल यांच्यातर्फे विशेष मुलांसाठी २ मे ते ३१ मे दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुट्यांमध्ये विशेष मुलांची गुणात्मक वाढ व्हावी याकरिता त्यांना शिबिरादरम्यान मैदानी, तसेच इनडोअर खेळ, हस्तकला, चित्रकला, ग्रुप ॲक्टिव्हिटी, नृत्य, गाणी, बौद्धिक व्यायामाचे उपक्रम, स्वयंपाक बनवणे असे विविध उपक्रम त्यांच्याकडून करून घेतले जाणार आहेत. या उन्हाळी शिबिरात कोणत्याही वयोगटातील विशेष मुलांना सहभागी होता येणार असून, त्यांचीही उन्हाळी सुटी ही मजेदार पद्धतीने जावी, असा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे.

शिबिरांनाही महागाई आणि उन्हाची झळ
१) शाळा तसेच संस्थांकडून राबवली जाणारी काही उन्हाळी शिबिरे ही विनामूल्य, तर काही सशुल्क असतात. सध्या इंधन दरात कमालीची वाढ झाल्यामुळे यंदा शहरापासून दूर काही दिवसांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या उन्हाळी शिबिरांच्या शुल्कात वाढ झाली आहे. वाहतूक खर्च, गॅस सिलिंडर, कामगारांचे वेतन आदी खर्च वाढल्यामुळे यंदा शहरापासून दूर आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांच्या शुल्कात पूर्वीच्या तुलनेत एक ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे.
२) ठाणे शहरात विविध संस्थांकडून आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिरांचे शुल्क हे ५०० रुपयांपासून ते १८ हजार रुपयांपर्यंत आहेत. यंदा सूर्याने रुद्रावतार धारण केल्यामुळे सर्वत्रच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तेव्हा उन्हाळी शिबिरांमध्ये होणारे मैदानी उपक्रम आयोजकांनी कमी केले आहेत. अधिक शिबिरातील उपक्रम हे सावली असणाऱ्या ठिकाणी तसेच इनडोअर घेण्याकडे आयोजकांचा कल आहे.

कोरोना साथीमुळे दोन वर्षांनंतर प्रथमच उन्हाळी शिबिराचे आयोजन करीत आहोत. मुलांना दोन वर्षांनंतर कोरोनामुक्त वातावरणात उन्हाळी सुटी आनंदात घालवण्यास मिळणार असल्याने प्रतिसाद फार चांगला आहे. यंदा महागाईमुळे शिबिराच्या शुल्कात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी मुलांना या सुटीचा पुरेपूर आनंद घालवता यावा, याकरिता अनेक नवनवीन उपक्रम आयोजित केले आहेत.
- रितेश नवरंगे, रुसटिक हॉलिडेज.

सुटीच्या दिवसात विशेष मुलांमध्ये गुणात्मक वाढ व्हावी, त्यांनाही घराबाहेर पडून सवंगड्यांसोबत सुटीत विविध उपक्रम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आम्ही कोरोनानंतर प्रथमच उन्हाळी शिबिराचे आयोजन करीत आहोत.
- भरत कासार, यश फाऊंडेशन स्पेशल स्कूल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80519 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top