
संयुक्त महाराष्ट्र दालनाला पुन्हा उभारी
- भाग्यश्री भुवड, मुंबई
मुंबई, ता. ३० : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या ‘संयुक्त महाराष्ट्र कला दालन’ला गेल्या दोन वर्षांच्या कोरोना साथीनंतर पुन्हा उभारी आली आहे. येथे भेट देणाऱ्या नागरिकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे दालन उभे राहिले. भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा इतिहासदेखील समजून घेणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर ही वास्तू मुंबईच्या दादर येथे उभारण्यात आली. २०१० ला उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या देखरेखीखाली आणि अध्यक्षतेखाली या वास्तूचे कामकाज करून घेतले.
----
संयुक्त महाराष्ट्र कला दालनात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील काही महत्त्वाच्या घटनांचा क्रम, या चळवळीत हुतात्मा झालेल्यांच्या नावाच्या नोंदीसह घटना लिहिण्यात आल्या आहेत. ज्या मुंबईत आपण आज राहत आहोत, त्या मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी त्यासोबत मराठी माणसाला त्याचा हक्क मिळावा यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारण्यात आली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची गाथा व बलिदान कधीच विसरले जाऊ नये या हेतूने हे कला दालन उभारण्यात आले आहे.
भारत स्वतंत्र होऊन १० वर्षे उलटून गेली. मराठी माणसाला हक्काचे राज्य मिळणे कठीण झाले होते. मराठी माणसाने मुंबईला रक्त आटवून वैभवाचे दिवस दाखवले होते. मुंबई जागतिक नकाशावर दिसू लागली होती. येथील गिरणी कामगारांना मुंबई आपल्याकडेच हवी होती, पण मुंबई गुजरातमध्ये जावी, असा अहवाल तयार करण्यात आला होता. कष्टकरी बांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळू न देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मुंबई गुजरात किंवा केंद्राच्या अख्यत्यारीत जाईल, असा आदेश केंद्र सरकारने दिला होता. मराठी माणसाने हा डाव मोडून टाकण्याचा निर्णय केला. त्यांचे नेतृत्व प्रल्हाद केशव अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखणी आणि वाणीने प्रचंड झंझावात निर्माण केला होता. ‘नवयुग’ या साप्ताहिकातून आणि त्यानंतर ‘मराठा’मधून त्यांनी मराठी माणसांची मने पेटवली. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, ती महाराष्ट्राची राजधानी झाली पाहिजे, या विषयावर प्रत्यक्ष परमेश्वराशी भांडण्याचा प्रसंग आला तरी आम्ही मागे राहणार नाही याच भावनेतून स. का. पाटील यांच्यासारख्या संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांचा धुव्वा उडवला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा ठाम निर्धार असल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपली लेखणी सुरू ठेवली.
स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भूमिगत राहून ब्रिटिश सरकारला हैराण करणारे एस. एम. जोशी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा प्रभावी नेता. संयुक्त महाराष्ट्र समितीचा जोशींमुळे जन्म झाला. समितीचे सरचिटणीस या नात्याने त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत अखंड आणि प्रभावी नैतृत्व केले. प्रबोधनकार ठाकरे यांनीही या लढ्यात सक्रिय सहभाग दर्शवला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आड येणाऱ्या कोणालाही त्यांनी आपल्या लेखणीतून, वाणीतून सोडले नाही. जगेन तर महाराष्ट्राकरिता, मरेन तर महाराष्ट्राकरिता ही मराठ्याची जिद्द आहे, असे ठणकावणारे प्रबोधनकार ठाकरे यांनी आपले आयुष्य महाराष्ट्राला अर्पण केले. यासह अनेक शाहिरांनी क्रांती केली. हा विरोध सहन न झाल्याने सरकारने आंदोलकांवर लाठी चार्ज, गोळीबार केला. यात १०६ हुतात्मे झाले. त्यात १५ वर्षीय मुलाचाही समावेश होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर ही आंदोलने करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले. त्यानंतर १ मे १९६० या कामगार दिनी मुंबईसह महाराष्ट्र एकत्रित आला आणि याच कामगार दिनी मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. असा सर्व इतिहास या कला दालनातून सांगण्यात आला आहे.
ॊॊ‘लाईट शो’ला गर्दी
संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे हे कला दालन सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असते. कला दालनात २०१८ पासून शाळकरी मुले येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याआधी एक परिपत्रक काढण्यात आले होते, त्यात सर्व शाळांना येथे भेट देणे अनिवार्य आहे, पण आता हे प्रमाण कमी झाले आहे. आता दिवसाला किमान ५० ते ६० जण या दालनाला भेट देतात. शरद पवार, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई अशा मोठमोठ्या मंडळींनीही वास्तूला भेट दिली आहे. यासह १ मे या दिवशी ‘लाईट शो’ ठेवला जातो, तो नजारा अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात, असे येथील कामगार गणेश कापटे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80527 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..