
दिवसाआड वेळेनुसार पाण्याचे नियोजन
प्रसाद जोशी : वसई
वसई-विरार शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या डोके वर काढत असतानाच नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याचा सारासार विचार करून महापालिकेने पाण्याचे नियोजन हाती घेत वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकात किती तास पाणी मिळणार याचा लेखाजोखा नव्याने मांडण्यात आला आहे. या नियोजनाचा फायदा दाट लोकवस्ती असलेल्या नालासोपाऱ्याला होणार आहे.
--------------
वसई-विरार महापालिकेने एक दिवसआड पाण्याचे वितरण जाहीर केले आहे. त्यासाठी वेळाही निश्चित केल्या असून, काही परिसरात दिवसातून दीड ते तीन तास पाणी वितरित केले जाणार आहे. जर पाण्याची काही समस्या उद्भवल्यास वॉल्व्हमनचे नाव व क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पूर्ण माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेने नालासोपारा शहराची वितरण यादी तयार केली आहे, ज्यात अनेक भागात कमी तास पाणी वितरित केले जाणार आहे.
नालासोपारा शहराची लोकसंख्या अधिक आहे. दाटीवाटीच्या वस्ती, चाळी, इमारती मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याची मागणी देखील जास्त आहे. पालिकेच्या पाणी विभागाकडून दिवसाआड, तासाचे प्रमाण आदींची माहिती घेतली जात आहे. ज्यात पूर्व आणि पश्चिम भागातील परिसर निश्चित करून ज्या ठिकाणी लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणी चार तास, तर कमी प्रमाण असेल तिथे दीड ते दोन तास पाणी मिळणार आहे. सकाळ व दुपारी पाणी सोडले जाणार आहे. शहरात सामूहिक नळजोडण्याही अनेक आहेत. या ठिकाणी मात्र नागरिकांना समस्या भेडसावण्याची शक्यता अधिक आहे.
तारांबळ उडणार
१) उन्हाळा सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याची अधिक गरज निर्माण झाली आहे. दिवसाआडवरून पालिकेने तासावर पाणी आणल्याने पाण्याची समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे पाणी नियोजनात थोडाफार बदल करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
२) नालासोपारा शहरातील पश्चिम भागात उमराळे, गावधणी, जोशी आळी, देशमुख आळी, गुराडे गाव, चक्रेश्वर आदी ठिकाणी दिवसाआड पाणी वितरित केले जाणार आहे; तर समेळपाडा, दत्तमंदिर परिसरात दीड तास पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडणार आहे.
...तर होणार बदल
पालिका हद्दीत पाणीपुरवठा होणाऱ्या सूर्या धरण, मासवण पम्पिंग स्टेशन, धुकटन जलशुद्धी केंद्र याठिकाणी तांत्रिक बिघाड झाला तर सद्यस्थितीत ठरवून दिलेल्या वेळेत बदल होऊन त्याप्रकारे नियोजनाने पाणी वितरित केले जाईल, असेही महापालिकेच्या पाणी विभागाने स्पष्ट केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80540 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..