
कामा रुग्णालयात मियावाकीचे नंदनवन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिकेने शहरामध्ये काही ठिकाणी उभारलेल्या मियावाकी उद्यानांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई पालिकेच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारतर्फे मुंबईतील कामा रुग्णालयात मियावाकी नंदनवन फुलवण्यात येणार आहे. कोरोना काळात शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. त्यावेळी अनेक रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला; परंतु कृत्रिम ऑक्सिजन मिळण्यात अडचणीदेखील आल्या. त्यामुळे कामा रुग्णालयात ७,०२६ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात स्वच्छ ऑक्सिजन रुग्णांना मिळणार असून, नागरिकांना वृक्ष लागवडीचा संदेश देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे कामा आणि अलब्लेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
-------
राज्य सरकारचे कामा रुग्णालय आणि अलब्लेस रुग्णालय हे महिला आणि मुलांवरील उपचारासाठी ओळखले जातात. या रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार होतात. या रुग्णालयात छोटे उद्यान होते, मात्र त्यात अत्यंत कमी झाडे होती. तसेच त्या उद्यानाखाली रॅबिटचा थर होता. कोविड काळात शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. त्यावेळी अनेक रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला. रुग्णालयातील या मोकळ्या उद्यानात मियावाकी (मिनी जंगल) करण्याचे डॉ. पालवे यांनी ठरविले आणि त्याप्रमाणे हालचाली सुरू केल्या.
पालिकेशी संपर्क करून केशव सृष्टीच्या माध्यमातून सीएसआर फंडातून हा मियावाकी मिनी जंगल फुलवण्याचा निर्णय झाला. कामा रुग्णालयातील १५ हजार चौरस फूट जागेवर मियावाकी पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या उद्यानात झाडे लावण्यात आली. १० दिवसांत हे जंगल तयार करण्यात आले. या उद्यानाच्या खाली असलेले रॅबिट काढण्यात आले. त्यानंतर माती, राख आणि गांढूळ खत, कोकोपीठ आणि नीम पावडर टाकून मैदान बनवण्यात आले. त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या ७४ प्रजातींची ७,०२६ झाडे लावण्यात आली. त्यानंतर ठिबक सिंचन देखील करण्यात आले, अशी माहिती या प्रकल्पाचे संयोजक समीर पालेजा यांनी दिली.
छोट्या उद्यानाचा उद्देश कमी जागेत जास्त झाडे लावण्यासोबत ऑक्सिजन निर्मिती करणे हा आहे. यात पारिजातक, कामिनी, पिंपळ, वड, बेल, कामिनी, रुख्मिणी, करंज, तगर यांसारखी ७४ भारतीय प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत.
- आरदीप राठोड, प्रकल्प व्यवस्थापक, केशव सृष्टी.
उद्यानाला प्लास्टिकचे कुंपण
मियावाकी उद्यानात वृक्षांना घालण्यात येणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, यासाठी त्यांच्याभोवती प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या उद्यानाला सध्या तारांचे कुंपण असले तरी, त्याला भविष्यात प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवलेल्या प्लास्टिकचेच कुंपण घालण्यात येणार आहे. कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या रॉडचे वजन हे जवळपास २.६ किलो इतके आहे. एका प्लास्टिकच्या रॉडसाठी ७८ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80548 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..