
ताम्हण वृक्षाला बहर
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल : सध्या सर्वत्र ताम्हण वृक्षाला बहर आला असून त्याच्या निळसर जांभळ्या रंगाच्या फुलांनी वातावरण प्रसन्न केले आहे. आपल्या लालसर, जांभळ्या, गुलाबी पांढरट रंगामुळे ताम्हण उन्हाळ्यात उठून दिसतो. राज्यात याला जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते.
वनांची शोभा वाढवण्याचे काम ताम्हण सांभाळतो. तसेच ताम्हणीच्या झाडाला साधारणपणे १ मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या काळात फुले येतात. म्हणून त्याला फूल महाराष्ट्राचे राजपुष्प असे संबोधले जाते. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणाऱ्या ताम्हण वृक्षाचे चित्र इयत्ता पाचवीच्या बालभारती पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सुद्धा छापले आहे. मेंदी कुळातील हा सपुष्प वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया असे आहे. ताम्हण वृक्ष विदर्भात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळतो. उन्हाळ्यात डोळ्यांना शांत करण्यासाठी आणि वनसौंदर्यात भर घालण्यासाठी ताम्हण येतो, असे गमतीने बोलले जाते. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या उन्हातही हे फूल सर्वांना हवेहवेसे वाटते.
मुंबई, कोकणात ताम्हण मोठ्या प्रमाणात आढळतो. सुशोभीकरण आणि सावली देणारे झाड म्हणून पनवेल परिसरातील सिडको वसाहतीमधून रस्त्यालगत या वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. ताम्हणाचे वैशिष्ट्य असे की, लहान झाडांना फुले येतात. ताम्हण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे. याच्या फुलांचा हंगाम हा साधारणपणे दोन ते तीन महिने चालतो. ताम्हणाला पाणी भरपूर हवे. पाणी आणि योग्य हवामान असले तर ताम्हण कधी दोनदाही फुलतो.
ताम्हण झाडाची साल औषधी असते. ताप आल्यास सालीचा काढा देतात, याची साल व पाने रेचक असतात. पानात व फळात हायपोग्लिसेमिक हे मधुमेहावर गुणकारी द्रव्य आहे. पानांपासून व वाळलेल्या फळांपासून चहासारखे पेय बनवतात, अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञ श्रीपाद लेले यांनी दिली.
सागाला पर्यायी लाकूड
झाडाचे लाकूड उंच, मजबूत टिकाऊ, चमकदार, लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीव काम करता येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही, ते लवकर कुजत नाही, त्यामुळे बंदरांमध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी लाकूड म्हणून वापरतात.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80549 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..