
अपघातग्रस्तांना मदत करा एक लाख मिळवा; केंद्राचा उपक्रम
ठाणे, ता. ३० ः डोळ्यादेखत एखादा अपघात घडला असेल किंवा अपघातग्रस्त वाहन दिसत असतानाही ‘मागे कटकट नको’ असे म्हणत अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. परिणामी रस्ते अपघातात वेळीच मदत न मिळाल्याने ७० टक्के जखमींना जीव गमवावा लागतो. ही जीवित हानी टाळण्यासाठी अपघातग्रस्तांना मदत करा आणि पाच ते एक लाखापर्यंत बक्षीस मिळवा, हा अभिनव उपक्रम केंद्र सरकारने सुरू केला आहे. त्याची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यातही सुरू झाली असून यापुढे अपघातग्रस्तांसाठी देवदूत बनून आलेल्यांचा यथोचित सन्मान होणार आहे.
रस्त्यावर एखादा अपघात घडला की अनेक मदतीचे हात धावून जातात; मात्र बऱ्याच वेळा मदतीला धावून येणारी व्यक्तीच पोलिसी व कायद्याच्या कचाट्यात सापडते. त्यामुळे इच्छा असूनही अनेक जण हा ससेमिरा टाळण्यासाठी पुढे धजावत नाहीत. ही वस्तुस्थिती ओळखून केंद्र सरकारने अशा देवदूतांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना रोख बक्षिसेही जाहीर केली आहेत. अपघातग्रस्तांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे प्राण वाचल्यास पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जितक्या व्यक्तीचे प्राण वाचवणार तितकी बक्षिसाची रक्कम मोठी हे सूत्र इथेही आहे.
विशेष म्हणजे विशेष कार्य करणाऱ्या १० जणांची निवड राष्ट्रीय पुरस्कारासाठी होणार असून त्यांनाही एक लाखाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस, शासकीय जिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विशेष म्हणजे अपघातात मदत करणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून या उपक्रमामुळे अपघातातील जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती वाढेल. परिणामी लवकर मदत व उपचार मिळाल्यामुळे बळींची संख्या कमी होईल अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80552 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..