
ऑन ड्युटी : संगीत कलेसोबत नृत्याची साथ जोपासली
- रजनीकांत साळवी
घरदार, संसार अशी जबाबदारी पार पाडून दिवस-रात्र आपल्या रक्षणासाठी पोलिस तत्परतेने कार्य बजावत असतात. त्याही परिस्थितीतून वेळ काढत फावल्या वेळेत व सुटीमध्ये संगीत आणि नृत्याची आवड पोलिस दलात कार्यरत असणारे समीर कदम आजही जोपासत आहेत. समीर हे मुलुंडच्या वाहतूक विभागात कार्यरत आहेत. अंगी असलेल्या कलेला जोपासण्यासाठी सवड नाही तर मनी आवड असावी लागते, असे ते सांगतात.
---------------
मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील वारेली या गावचे असलेले समीर कदम यांचे बालपण वरळीतील बीडीडी चाळ पोलिस वसाहतीत गेले. शालेय जीवनापासूनच त्यांना नाटक, संगीत आणि नृत्याची आवड. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने भाग घेऊन त्यात अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली. त्यांना बालपणापासूनच वडील व भावांकडून गायनाचे आणि नाट्याचे धडे मिळाले. वडील गोपाळ कदम हे देखील पोलिस दलात कार्यरत होते. त्यावेळेस ते पोलिसांसाठी नाटक बसवायचे, अनेक नाटकांत त्यांनी देखील काम केले होते.
रेल्वेत नोकरी करणारे भाऊ मनोहर कदम व गावी असणारे वामन कदम हे देखील त्यावेळी छोटी-मोठी नाटके बसवत. तसेच गायन, भजनही करत होते, ते पाहत असताना हळूहळू मलादेखील गायनाची, नृत्याची गोडी लागली. त्यांच्याकडून जणू मला बाळकडूच मिळाल्याचे समीर यांनी सांगितले.
चाळीत असताना अनेक नाटक, एकांकिकांमधून त्यांनी काम केले. अनेक मुलांना कलेचे धडे दिले. आजही ड्युटी सांभाळून रात्री घरी परतल्यावर दोन तास व पहाटे लवकर उठून गायनाचा सराव करणे, हे नित्यनेमाचे ठरले आहे.
कधी सुटीच्या दिवसात नृत्याचा सराव करणे, तर कधी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांना नाटक, गायनाचे आणि नृत्याचे मार्गदर्शन करून आवड जोपासण्यावर त्यांनी भर दिला आहे. यामुळे मन स्थिर राहते, एक प्रकारे आनंद मिळतो आणि अंगी असलेली कलाही जिवंत राहते, असे समीर सांगतात. समीर यांनी शालेय जीवनात नाटक, नृत्य आणि संगीतात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली आहेत. पोलिस दलाच्या दिवाळी मेळाव्यात, तसेच पोलिसांच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात ते सूत्रसंचालनही करतात. या सर्व कामात त्यांना पत्नी आणि मुलगी देखील सहकार्य करतात.
कलेचे चीज झाल्याचे समाधान
सोनी टीव्हीवरील १९९७ मध्ये गजलेल्या `बुगी वुगी` या नृत्य स्पर्धेमध्ये समीर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांचे नृत्य बसविले होते. त्यात या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक मिळाले होते. आजही त्यांनी मार्गदर्शन केलेले विद्यार्थी अनेक मालिकांमधून झळकताना दिसतात. त्यावेळेस ते विद्यार्थी भेटायला आल्यावर आनंद होतो व आपल्या कलेचे चीज झाल्याचे समाधान मिळते, असे समीर सांगतात.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80556 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..