
पालघर जिल्ह्यात कामगारांसाठी इस्पितळाची वानवा
वसई, ता.३० ( प्रसाद जोशी ) : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर येथे आहे. मात्र, दुर्घटना घडल्यास येथील कामगारांसाठी कामगार इस्पितळाची व्यवस्था नाही. ईएसआयसी सुविधा असली तरी मात्र कांदिवली येथे उपचारासाठी धाव घ्यावी लागते. त्यामुळे जिल्ह्यात इस्पितळ झाले तर येथील कामगारांना त्यांच्या सुरक्षेची हमी मिळणार आहे.
तारापूर प्रकल्प, भाभा अणुसंशोधन केंद्र यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९८२ च्या सुमारास तीन हजार एकरवर स्थापन केलेल्या बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादन घेणारे २ हजार उद्योगधंदे कार्यरत आहेत; तर वसई-विरार, वाडा येथे देखील कारखानदार विविध उत्पादने तयार करतात. जिल्ह्यात एकूण छोटे-मोठे ७ ते ८ हजार उद्योगधंदे आहे. यासाठी मुंबई , ठाणे, पालघरसह गुजरात सीमा आदी ठिकाणाहून कामगार येत असतात. कामगारांचा आकडा पाहिल्यास एक लाखाहून अधिक आहे. कंपनीत काम करताना कधी अपघात होणे, उंचावर काम करताना देखील तोल गेल्याने दुर्घटना घडते, असे अनेक प्रसंग कामगारांना झेलावे लागतात, यावेळी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. ईएसआयसीचा लाभ जरी मिळत असला तरी मात्र कामगारांसाठी इस्पितळाची व्यवस्था नाही. त्यामुळे मुंबईकडे धाव घ्यावी लागते. दाखल केल्यावर प्रथम कारखानदार मालक स्वतःच्या खर्चाने इलाज करतात व त्यानंतर कांदिवली येथे ईएसआयसी कार्यालयात क्लेम केल्यावर पैसे मिळतात. मात्र यात वेळ जातो, जर ईएसआयसी कामगार इस्पितळ उभारले गेले तर अशा कामगारांना त्वरित आरोग्य सेवा मिळू शकते. जिल्ह्यातील कामगारांची संख्या पाहता इस्पितळ उभारणीसाठी सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे कारखानदारांचे म्हणणे आहे.
----------------------------------
पालघर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी ईएसआयसीचे हॉस्पिटल असावे याकरिता आमचे कामगार नेते राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर अन्य समस्यादेखील मांडणार आहोत. रुग्णालय झाले तर आरोग्य सेवा तातडीने मिळेल व वेळ, पैसे वाचणार आहेत.
- प्रफुल्ल साने- सचिव, स्थानिक कामगार युनियन, पालघर जिल्हा.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80563 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..