छकडा शर्यतीचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छकडा शर्यतीचा थरार
छकडा शर्यतीचा थरार

छकडा शर्यतीचा थरार

sakal_logo
By

वसंत जाधव, नवीन पनवेल :
बैलगाड्या आणि छकड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठवण्यात आल्‍याने पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पुन्हा अनुभवायला मिळत आहे. लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येत असून छकडा प्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मे आणि जून महिन्यात स्पर्धांची संख्या आणखी वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. घाट माथ्याप्रमाणेच रायगडातही बैलगाड्यांच्या शर्यतीला प्रचंड लोकप्रियता आहे.
छकड्यांच्या शर्यतीला अनेक वर्षांची परंपरा आहे. याकरिता पूर्वी अनेक शेतकरी शर्यतीसाठी बैलजोडी पाळत. त्यांची निगा राखून स्पर्धेसाठी प्रशिक्षण दिले जायचे. मात्र न्यायालयाने बंदी घातल्‍याने शर्यतींचे आयोजन बंद झाले होते. आता न्यायालयाने काही अटी शर्ती तशाच ठेवून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली. आणि गेल्या काही महिन्यांपासून पनवेल परिसरातही छकड्यांच्या शर्यतीचा धुरळा उडू लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कर्जत, पेण, अलिबाग, ओवळे या प्रमुख ठिकाणी शर्यती पार पडल्या आहेत. या ठिकाणी जवळपास तीनशे बैल जोड्या शर्यतीसाठी सहभागी झाल्‍या होत्‍या. एका बैलगाड्यामागे १०० ते १५० शर्यत शौकीन उपस्थित राहून प्रोत्साहन देत आहेत. हा थरार अनुभवण्यासाठी दिवसेंदिवस मोठी गर्दी होत आहे.
आयोजकांच्या वतीने वेगवेगळ्या बक्षिसांची खैरात करून गाडा मालकांना आकर्षित करण्यात येत आहे. कर्जत, पनवेल आणि पेण तालुक्यांमध्ये घाट माथ्याबरोबरच ठाणे जिल्ह्यातूनही गाडामालक आपली बैलजोडी शर्यतीमध्ये उतरवत आहेत. मे आणि जून महिन्यात अनेक गावांमध्ये जत्रेच्या निमित्ताने शर्यती रंगणार आहेत. क्रिकेटबरोबरच बैलगाड्यांची स्पर्धाही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

कोट्यवधींचा उलाढाल
पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे फिव्हर आहे. पावसाळा वगळता इतर आठ महिने क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या गावात आणि शहरांमध्ये भरतात. आयोजकांच्या वतीने लाखो रुपयांचे बक्षीस क्रिकेटच्या सामन्यांवर लावले जाते. छकड्यांच्या शर्यती बंद झाल्याने साहजिकच क्रिकेटचा फिवर वाढला होता. परंतु बैलगाड्या शर्यतीवरील बंदी उठवल्यामुळे पुन्हा छकड्यांचा थरार पहावयास मिळत आहे. या शर्यतीवर कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे.

मध्यंतरी छकड्यांच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. बैलगाडा मालकांनी बंदी उठवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली. सरकारकडूनही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. न्यायालयाने बंदी उठवल्‍याने छकड्यांच्या शर्यतीला पुन्हा सोन्याचे दिवस आले आहे. न्यायालयाने दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करून शर्यती घेण्याबाबत संघटनेकडून सूचित केले जात आहे. यामुळे खिलार आणि गावरान प्रजातींच्या बैलांची मागणी पुन्हा वाढली आहे. यावर अवलंबून असणारे व्यवसायांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर पारंपरिक शर्यतीला थरार सुद्धा बैलगाडाप्रेमींना अनुभवता येत आहे.
- पंढरीनाथ फडके,
अध्यक्ष, महाराष्ट्र बैलगाडा मालक संघटना


बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिला नाही तर राज्याची परंपरा आणि शर्यतीबद्दल सर्वसामान्यांना किती प्रेम आहे, याचे दर्शन रायगड जिल्ह्यातील पनवेल व कर्जत तालुक्यात पाहायला मिळते. शासकीय नियमांचे पालन करून बैलगाडा शर्यत सुरू आहेत. छकड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी छकडेप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
- विजय खानावकर,
नगरसेवक तथा बैलगाडा प्रेमी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80566 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top