
चिरनेर काँग्रेसच्या युवा नेत्यांवर प्राणघातक हल्ला
उरण, ता.३० (वार्ताहर) : चिरनेर गावातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला करून पलायन केले. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन घबाडी हे चिरनेर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या शीतल घबाडी यांचे पती आहेत.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सचिन घबाडी हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतावरील फार्म हाऊसवर चिरनेर येथील रस्त्यावरून जात असताना वाहनात दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याची माहिती मिळताच रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव परदेशी, तिरंगा पतपेढीचे चेअरमन अलंकार परदेशी, काँग्रेस पक्षाचे युवा इंटक तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नितेश ठाकूर, अमर ठाकूर, घबाडी यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेसंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80568 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..