
आम्ही शोषित-वंचित म्हणजे उपहिंदूच!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : सध्या राज्यात आणि देशात हिंदुत्वाचा गजर सुरू आहे. हिंदू या धर्मावर आणि शब्दावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे. त्यामुळे आमचे असे म्हणणे आहे, की हे तिघेच हिंदू आहेत; तर तमाम शोषित-वंचित म्हणजेच अनुसूचित जातीमधील बौद्ध वगळून इतर एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी हे सर्व ‘उपहिंदू’ आहेत. या उपहिंदूंनी हिंदुत्वाच्या वादात उडी मारून स्वत:ची माथी भडकावून घेऊ नयेत, असे आवाहन करीत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी नवा सिद्धांत मांडला आहे.
येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आझाद मैदान येथे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करावे, यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा नेण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ राठोड यांनी हा सिद्धांत मांडला.
राज ठाकरेंना फायदा नाहीच
राज ठाकरे यांच्या सभेबद्दल विचारले असता, भोंग्यांचा प्रश्न हा आजचा नाही; मात्र राज ठाकरे नाहक हा वाद उकरून काढत आहेत. त्यांच्या सभेला परवानगीच द्यायला नको होती; मात्र आता परवानगी दिली तरी त्याचा त्यांना आणि त्यांच्या पक्षाला फायदा होणार नाही. कारण हिंदू म्हणून त्यांना मतदान होणार नाही हे सोळा आणे सत्य आहे, असे राठोड म्हणाले.
लोकांना वस्तुस्थिती समजली
हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न काही लोकांचा आहे. हिंदूंच्या नावावर मते मागणाऱ्यांचा डाव आता उधळून लावला जाणार आहे. कारण लोकांना वस्तुस्थिती समजली आहे. आम्ही सर्व उपहिंदू आहोत; हे उपहिंदूच आता ठाकरे बंधू आणि फडणवीस या हिंदूंचा डाव उधळून लावतील. कारण हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे, असेही राठोड यांनी सांगितले.
दरम्यान, येत्या महाराष्ट्र दिनी, देशातील कामगार हिताचे ४४ कायदे रद्द करून ४ नवीन कायद्यांनुसार कामगार व कामगार संघटनांविरोधी केलेले बदल रद्द करावेत, परदेशी शिष्यवृत्तीकरिता उत्पन्नाची अट अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीकरिता घटनाबाह्य असल्याने उत्पन्नाची अट रद्द करावी, परदेशी शिष्यवृत्तीची संख्या कर्नाटकप्रमाणे ४५०+ करण्यात यावी, परदेशी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता शिष्यवृत्तीची रक्कम अदा करताना डॉलर रेटप्रमाणे द्यावी, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व खासगी शिष्यवृत्ती व फ्री शिप योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80581 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..