संयुक्त महाराष्ट्राच्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संयुक्त महाराष्ट्राच्या
संयुक्त महाराष्ट्राच्या

संयुक्त महाराष्ट्राच्या

sakal_logo
By

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शिलेदार

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांचे खूप मोठे योगदान आहे. त्यातील एक मोठं नाव म्हणजे शाहीर आत्माराम पाटील. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी इंद्राणी पाटील यांनी आत्माराम पाटील यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अनेक आठवणींना उजाळा दिला.
- विनोद राऊत
...

संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा
खुशाल कोंबडं झाकून धरा.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जीव ओतणारा शाहीर आत्माराम पाटील यांचा हा गोंधळ. पहिल्यांदा १९५६ मध्ये शिवाजी पार्क इथे झालेल्या महाराष्ट्रवाद्यांच्या पहिल्या सभेत हा गोंधळ सादर केला गेला. त्यावेळी मंचावर सिंकदर शेख, राघो कदम, वसंत तळेकर, भास्कर मुणगेकर अशे शाहीर उपस्थित होते. सभेला उपस्थित लोकांनी आत्माराम पाटलांचा हा गोंधळ सादर करण्याची मागणी केली. तेव्हा अण्णा भाऊ साठे उभे राहिले. म्हणाले, मी माझे स्वतःचे गीत गात नाही, मात्र मी आत्माराम पाटलांचा गोंधळ गातो. आणि अण्णा भाऊ साठे यांनी हा गोंधळ गायलाच. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
--
मुंबई, प्राण आमुचा, मराठी मावळ्यांचा, महाराष्ट्राचा

मुंबईतील चौपाटीला बैठक झाली. त्या बैठकीत कॉंग्रेस नेते स. का. पाटील म्हणाले, सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्यामुळे सर्वजण पेटून उठले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला तिथून सुरुवात झाली. निषेध, मोर्चे सुरू झाले. त्यावेळी आत्माराम पाटील यांनी मुंबईवर पोवाडा रचला.

मुंबई, प्राण आमुचा, मराठी मावळ्यांचा, महाराष्ट्राचा
प्राणावीन तनु, अजब हा न्याय
लोकशाहीत कराया अन्याय
पाहुया व्यायली कुणाची माय !

...

कलापथकात सामील झाले

१९५७ मध्ये मी शाहीर आत्माराम पाटील यांच्या कलापथकामध्ये सामील झाले. त्यावेळी माझे वय १५ वर्षांचे होते. मी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाणी गायची, आत्माराम पाटील यांना साथ करायची. माझी आई काँग्रेसच्या काळात कस्तुरबा गांधी यांच्यासोबत होती. मामा स्वातंत्र्यसैनिक. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा मलाही सत्याग्रहात भाग घेतला पाहिजे असं वाटायचं. प्रजा समाजवादी पक्षाच्या प्रमिला दंडवते, मृणालताई (गोरे) या ज्येष्ठ नेत्यांसोबत राहून मला ते कळालं. मला साडी नेसता येत नसायची. अगं तुला साडी नेसता येत नाही, तू सत्याग्रहात कशी भाग घेणार, असं प्रमिलाताई मला म्हणायच्या.
--
पहिलं गाणं
वयाच्या नवव्या वर्षापासून गायचे. मला आत्माराम पाटलांकडून गाण्यासाठी बोलावलं गेलं. त्यांचे डांगचे दीडशे ओळींचे गीत होते. मी आठ दिवसांत ते पाठ केले. शिवाजी पार्कात झालेल्या सभेत मी डांगचे गीत सादर केलं. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, बाळ तू खूप छान गायली. आता आम्हाला डांगबद्दल काही माहिती सांगायची गरज नाही. मी म्हणाले, मी फक्त गायलं आहे. ते लिहिलंय आत्माराम पाटील यांनी!
--
आंदोलनाचा जोश
आंदोलनाच्या दिवसांत आम्ही बेळगाव, कारवार, डांग, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा देत असायचो. त्यावेळी शाहिरांचे मोठे आकर्षण होते. आत्माराम पाटील यांच्या १३ जणांच्या कलापथकाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. ते मोर्चा, आंदोलनात कधी सहभागी झाले नाहीत. मात्र, प्रत्येक सभा त्यांच्या कवितेने गाजवल्या.
--
चळवळीसाठी संसार वाऱ्यावर

शाहीर आत्माराम पाटील यांनी लढ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले. एवढा चांगला भाजीचा व्यापार असताना त्याकडे दुर्लक्ष झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १९५७ मध्ये आंदोलनासाठी त्यांनी कलापथक तयार केले. चळवळीसाठी त्यांच्यावर साडेचार लाखांचे कर्ज होते. १९९० पर्यंत आम्ही ते कर्ज फेडले. पक्षासोबत नसल्यामुळे त्यांना पक्षाचे पाठबळ मिळाले नाही. मात्र, संयुक्त महाराष्ट्र झाला याचा त्यांना जो आनंद झाला, तो शब्दांत वर्णन करू शकत नाही. आमच्या दुकानातील नोकर मला म्हणायचे, तुम्ही कृपया सांगा दादांना, आता बस करा. मात्र मी काय सांगणार? आत्माराम पाटील म्हणायचे, तू काय उपाशी आहे का? दोन वेळचे जेवण तुला मिळत नाही का? मलाही त्यांचे बोलणे पटायचे.
---

बाबासाहेब पुरंदरेंना मदत

बाबासाहेब पुरंदरे यांना ‘जाणता राजा‘ नाटक काढायचे होते. त्यासाठी पैसे जमवण्यासाठी ते पुण्यावरून भायखळा बाजारात येऊन कोथिंबीर विकायला यायचे. त्यांना आत्माराम पाटील यांच्याबद्दल कळले. राणीच्या बागेत दोघे भेटले. ते म्हणाले, जाणता राजा काढण्यासाठी मी पैसे उभारत आहे. मात्र, पैसे जमवण्यासाठी मी भाजीचा व्यापार करतोय. आत्माराम पाटील यांनी जॅकेट त्यांच्या हाती दिलं. म्हणाले, यातील जेवढे पैसे असतील ते तुमच्या जाणत्या राजासाठी!

--
शालेय पुस्तकात अजूनही धडा नाही
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला कित्येक साल लोटले आहेत. मात्र, अजूनही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा एक धडा पाठ्यपुस्तकात सामाविष्ट करता आला नाही, अशी खंत आहे. मुंबई कशी मिळाली, संयुक्त महाराष्ट्र कसा काय झाला, हे तुम्ही नव्या पिढीला कसं सांगणार? तुम्ही १०५ हुतात्मे सांगता. मात्र, त्याचा इतिहास कसा सांगणार?
--
मुंबईची मिसळ झाली
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मुंबईतील माय मराठीची इंग्रजी भाषेत मिसळ वाढताना दिसली. इतर भाषिकांचा पगडा वाढत होता. आत्माराम पाटील अस्वस्थ असायचे. मात्र, ते कुणाला बोलून दाखवणार? त्यांचा अस्वस्थपणा मग कवितेतून व्यक्त व्हायचा.

मिसळ झाली मुंबई
रं दादा मिसळ झाली मुंबई
धान्यात मिसळ, वाणात मिसळ
तुपात मिसळ, तेलात मिसळ
लबाड व्यापाऱ्यांनी केली मिसळ पुरी मुंबई
....

शासकीय घरही नाकारलं

आत्माराम पाटील यांच्या डोक्‍यावर कर्ज होते. मात्र, तरीही त्यांनी अखेरपर्यंत सर्वांना मदत केली. मुलगा दहावीत पहिला आला होता. त्याच्या कॉलेज प्रवेशासाठी पैसे नव्हते. कसेबसे करून मुलाला प्रवेश मिळाला. एकदा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहातून आत्माराम पाटील यांना त्यांच्या गाडीतून घरी पोहोचवले. आमचं घर दीडशे वर्षांचं मोडकं तोडकं. दादा घरी आले, घरात त्यावेळी लाईट नव्हती. आत्माराम पाटील म्हणाले, ही माझी खोली. घरात २ हजार पुस्तकं विखुरली होती. वसंतदादांनी आत्माराम पाटील यांना म्हटलं, तू असल्या घरी राहतो. त्यावेळी वसंतदादा यांनी इंदिरा गांधींवर पोवाडा लिहिण्याची विनंती केली. पाटील तुम्हाला मी गाडी, बंगला देतो असं म्हटलं. मात्र त्यांनी नम्रतेने नाकारलं. शासकीय कोट्यातील घरही आत्माराम पाटील यांनी विनम्रपणे नाकारलं.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80588 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top