अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh naik
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ

नवी मुंबई : शारीरिक शोषण आणि रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी दाखल असलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्‍ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी दाखल केलेले अर्ज शनिवारी ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावले. त्यामुळे उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता धाव घेण्यासाठी सात दिवसांचा अंतरिम जामीन देण्याची नाईक यांच्या वकिलाने केलेली मागणीही न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांना आता कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी मंत्री आणि भाजपचे ऐरोली येथील आमदार गणेश नाईक यांच्यासोबत २७ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेने त्यांच्यावर लैंगिक व शारीरिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

त्याआधारे पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीडी पोलिस ठाण्यात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केले होते; मात्र बुधवारी किंवा गुरुवारीही त्यांना अंतरिम जामीन मिळू शकला नाही. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत दोन्ही बाजूंची पडताळणी पूर्ण होऊ न शकल्याने नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर करायचा की नाही यावरील निर्णय शनिवारी देणार असल्याचे न्या. एन. के. ब्रम्हे यांनी स्पष्ट केले होते.

शनिवारी याप्रकरणी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना तक्रारदार महिलेसोबत केलेले कृत्य गंभीर स्वरूपाचे असल्याने गणेश नाईक यांना चौकशीसाठी अटक होणे आवश्यक असल्याचे तसेच ते पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांची वैद्यकीय तपासणी होणे महत्त्वाचे असून, पुन्हा ते तशा प्रकारचे कृत्य करू शकतात. याशिवाय त्यांना जामीन दिल्यास ते संबंधित महिलेवर पुन्हा दबाव टाकू शकतात. नाईक यांच्याकडील रिव्हॉल्व्हरची रिकव्हरी होणे आवश्यक असल्याने त्यांना चौकशीसाठी अटक होणे आवश्यक असल्याचे कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्‍ट्रवादीत प्रवेश करणार : पीडित महिला
मला न्याय मिळावा व माझ्या मुलाला गणेश नाईक यांचे नाव मिळावे यासाठी आपण हा लढा उभारला असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणाऱ्या महिलेने सांगितले. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून त्याबाबत राष्ट्रवादी पक्षाकडे अर्जही केल्याचे तिने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80591 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top