
टेनिस कॉम्प्लेक्सला दिलेले गणेश नाईकांचे नाव काढा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमधील टेनिस कॉम्प्लेक्सला देण्यात आलेले गणेश नाईकांचे नाव काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केली आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे निवेदनाद्वारे गायकवाड यांनी मागणी केली आहे. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन हे नवी मुंबईतील नामांकित आणि श्रीमंतांचे क्रीडा संकुल म्हणून प्रसिद्ध आहे. या संकुलात अद्ययावत असे टेनिस कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले आहे. या संकुलाला गणेश नाईकांचे नाव देण्यात आले आहे. या संकुलात अनेक होतकरू तरुण-तरुणी टेनिसचा सराव करण्यासाठी येत असतात.
नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर क्रीडा संकुल आणि टेनिस कॉम्प्लेक्सचे नाव खराब होत असल्याचा दावा दिव्या गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्सला दिलेले नाईकांचे नाव काढून राष्ट्रपुरुष किंवा जागतिक दर्जाच्या क्रीडापटूचे नाव द्यावे, अशी मागणी गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे. तसेच लवकरच या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
------------
राष्ट्रवादीकडून दखल
नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा प्राजक्ता मोंडकर यांनी याप्रकरणी महिलांच्या शिष्टमंडळासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे समजते. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य पातळीवरील महिला नेत्या उपस्थित होत्या.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80592 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..