
महाडच्या प्रशासकीय भवनाचा मार्ग मोकळा
महाड, ता. १ (बातमीदार) ः महाड तालुक्यातील महसूल विभागाच्या जुन्या इमारती जीर्ण झाल्या असून या ठिकाणी काम करणे अडचणीचे झाले आहे. त्यातच महाडमध्ये सातत्याने येत असलेले महापूर व चक्रीवादळ, दरड कोसळणे अशा आपत्ती काळात महसूल विभागाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी नव्या इमारतीची गरज आहे; परंतु जागेअभावी हा प्रस्ताव रेंगाळला होता. आता सरकारी जागा मिळाल्याने महाडच्या प्रशासकीय भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाडचे तहसील कार्यालय हे जुन्या ब्रिटिशकालीन जागेत आहे; तर प्रांत कार्यालय बसस्थानकाजवळ सरकारी गोदामाच्या जागेत आहे. या दोन्ही ठिकाणी जागा अपुरी आहे. शिवाय येणाऱ्या नागरिकांना पार्किंग व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ताही अरुंद आहे. त्यामुळे आपत्काळात कर्मचाऱ्यांना बाहेर पडणे कठीण होते. शिवाय गतवर्षी महापुरात दोन्ही कार्यालयांत पाणी शिरल्याने कागदपत्रांचेही मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या इमारती झाल्या आहेत; परंतु महाडला मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने प्रशासकीय भवन रखडले होते. महाड तालुक्यातील वाढते शहरीकरण व नागरीकरणाच्या दृष्टीने येथील महसूल व्यवस्थेतील महत्त्वाच्या इमारतीचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत कार्यालय) व तहसीलदार कार्यालयाच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
महसूलकडून आदेश निर्गमित
महाड शहराजवळील चांभारखिंड येथील जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभागाच्या जागेपैकी १.६२.७० हेक्टर जमीन महाड तालुका मध्यवर्ती प्रशासकीय भवन इमारतीसाठी प्रदान करण्याचा निर्णय महसूल विभागाने निर्गमित केला आहे. तसा शासन निर्णय महसूल व वन विभागाने २८ एप्रिलला अवर सचिव श्रीकृष्ण पवार यांच्या सहीने पारित केला आहे.
......
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80904 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..