
एटीएम कार्ड चोरास अटक
नवी मुंबई, ता. ४ (बातमीदार) : एटीएम कार्डद्वारे पैसे काढणाऱ्या व्यक्तीच्या कार्डची अदलाबदल करून त्यांच्या एटीएम कार्डमधून रक्कम काढून घेणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. विक्की पंडित साळवे (वय ३०) असे या गुन्हेगाराचे नाव असून तो उल्हासनगर येथील रहिवासी आहे. त्याने नवी मुंबई, जळगाव, जालना आणि भोपाळ या भागात केलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीविरोधात विविध पोलिस ठाण्यांत ११ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
आरोपी विक्की साळवे याने तुर्भे नाका येथील एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्या एटीएम कार्डचा पिन नंबर पाहून घेतला होता. त्यानंतर त्याने हातचलाखी करून एटीएम कार्ड धारकाजवळचे कार्ड घेऊन त्याला कार्ड खराब झाल्याचे सांगितले. आणि त्याला त्याच प्रकारचे एचडीएफसी बँकेचे दुसरे कार्ड देऊन पळ काढला होता. त्यानंतर विक्की व त्याच्या साथीदारांनी या एटीएम कार्डचा वापर करून ५० हजार रुपये काढून घेतले. जानेवारी महिन्यात ही घटना घडली होती. याबाबत तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. आरोपीच्या उल्हासनगर येथील घरावर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80937 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..